दोन लाख रूपये द्या, नाहीतर पुलवामासारखा हल्ला करून शाळा उडवून देण्याची धमकी देणाऱ्या उत्तर प्रदेशमधील दहावीच्या विद्यार्थाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी भा.द.वि नुसार अल्पवयीन मुलावार ३८६ आणि ५०७ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बरेली येथे दहावीतील एका विद्यार्थ्याने स्फोट घडवून शाळा उडवण्याची धमकी दिली होती. त्या विद्यार्थानं एक पत्र लिहून शाळेकडे तब्बल दोन लाख रूपयांची खंडणी मागितली होती. पत्रामध्ये त्या विद्यार्थानं शाळेच्या आवारात आणि घरात बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता, असं पोलिसांनी सांगितले.

शाळेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलाने रविवारी शाळेला एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यानं खंडणीसाठी दोन लाखांची मागणी केली होती. जर रक्कम दिली नाही तर शाळेत पुलवामासारख्या हल्ल्याची धमकी दिली होती.’

पत्र मिळताच क्षणी शाळेनं पोलिसांनी सुचीत केलं. त्यानंतर पोलीस बॉम्ब शोधक पथकासह शाळेत दाखल झाले. पण त्यांना काही भेटलं नाही. पोलिसांनी आणि शाळेनं मोकळा श्वास सोडला.

पण मुलगा इतक्यावरच थांबला नाही. त्या मुलाने मंगळवारी पुन्हा शाळा उडवून देणारं पत्र पाठवलं. पैसे नाही दिल्यास गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल, असा इशाराही त्या पत्रात दिला होता. शाळेनं पुन्हा एकदा पोलिसांत तक्रार केली.

तक्रारीनंतर पोलीस पुन्हा एकदा शाळेत दाखल झाले. पोलिसांनी पत्र पाहिल्यानंतर आपला शोध सुरू केला. हे पत्र लिहिण्यासाठी वापरण्यात आलेला कागद विज्ञानाच्या वहीतून फाडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यानंतर दहावीच्या मुलांच्या वह्यांची तपासणी करण्यात आली आणि आरोपी विद्यार्थ्याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याला उत्तरे देता आली नाहीत. दरम्यान, दोन्ही पत्रं कोणाच्यातरी दबावात लिहिल्याचं त्या विद्यार्थानं पोलिसांना सांगितले.