भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज जिवंत असते तर ते भाजपात असते, असे विधान उत्तर प्रदेशमधील प्रशासकीय अधिकारी लालजी प्रसाद निर्मल यांनी केले आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने दलित समाजासाठी सुरु केलेल्या विविध योजनांचा दाखला देताना त्यांनी हे मत मांडले आहे.

उत्तर प्रदेश अनुसूचित जाती वित्त विभागाचे प्रमुख लालजी प्रसाद निर्मल यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात भाष्य केले आहे. ‘केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने दलितांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. आजवर कोणत्याही सरकारने दलित समाजासाठी इतके काम केले नव्हते. केंद्रातील सरकारने चालू आर्थिक वर्षात दलित समाजासाठीच्या योजनांसाठी तब्बल १३८ कोटी रुपये दिले आहेत’, असा दावा त्यांनी केला.

जर बाबासाहेब आंबेडकर आज जिवंत असते तर ते भाजपात असते, असेही त्यांनी सांगितले. विद्यमान सत्ताधाऱ्यांचे काम पाहून आंबेडकरांनी त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असता, असा त्यांच्या विधानाचा सूर होता. उत्तर प्रदेशमधील अनुसूचित जाती वित्त आणि विकास विभागाने १२, २८० कुटुंबांना १४. २७ कोटी रुपयांची मदत केल्याचे त्यांनी नमूद केले.

निर्मल यांनी यापूर्वीही नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे दलितांचे राम असल्याचे विधान केले होते. तर एप्रिल महिन्यात त्यांनी योगी आदित्यनाथ यांना दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. आंबेडकर महासभातर्फे हा पुरस्कार दिला जातो. निर्मल हे आंबेडकर महासभेचेही प्रमुख असून या पुरस्कार सोहळ्यानंतरच योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्याकडे उत्तर प्रदेश अनुसूचित जाती वित्त आणि विकास मंडळाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती.