न्यायालयाचा वेळ वाया घालविल्याबद्दल दिलगिरी

नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय) २००३ मध्ये दिलेल्या अहवालाच्या गोषवाऱ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मुस्लीम पक्षकारांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात घूमजाव केले आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. बाबरी मशिदीपूर्वी तेथे एक मोठे बांधकाम अस्तित्वात होते, असे अहवालामध्ये म्हटले आहे.

मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर सांगितले की, एएसआयच्या अहवालाच्या गोषवाऱ्यावर पक्षकारांना प्रश्नचिन्ह उपस्थित करावयाचे नाही. बाबरी मशिदीखाली कलाकृती, मूर्ती, खांब आणि अन्य घटक दिसले असे अहवालामध्ये म्हटले आहे त्यावरून तेथे एक मोठे बांधकाम अस्तित्वात होते, असे सूचित होत असल्याचे ते म्हणाले.

कायद्यानुसार तोडगा उपलब्ध होता त्याचा त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात वापर केला नाही. असे असताना एएसआयच्या अहवालास घेतलेल्या आक्षेपांबाबत या टप्प्यावर कसा विचार करणार, अशी विचारणा बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केली. त्यामुळे मुस्लीम पक्षकारांनी गुरुवारी नमूद केलेल्या बाबींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

अहवालाच्या प्रत्येक पानावर स्वाक्षरी करणे अपेक्षित नाही, त्यामुळे अहवाल आणि गोषवारा याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही, जर आम्ही न्यायालयाचा वेळ वाया घालविला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे वकिलांनी सांगितले.