इसिसच्या ट्विटर खात्याचे संचालन भारतातून करणाऱ्या व्यक्तीस येथील एका अपार्टमेंटमध्ये शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. मेहदी मसरूर बिस्वास असे त्याचे नाव असून त्याने ‘@ShamiWitness’हे ट्विटर खाते चालवल्याची कबुली दिली आहे व तो इंग्रजी बोलणाऱ्या इसीस अतिरेक्यांच्या जवळचा आहे, असे कर्नाटकचे पोलिस महासंचालक एल. पाछाऊ यांनी सांगितले. ब्रिटनमधील  ‘४ न्यूज’ चॅनेलने याबाबतचे वृत्त गुरुवारी रात्री दिले होते.
उत्पादन अभियंता म्हणून काम करणारा मेहदी बिस्वास बेंगळुरू येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला असून त्याला वर्षांला ५.३ लाखांचे पॅकेज आहे. इसिससाठी लोकांना भरती करण्याचे काम तो करीत असे व जिहादी साहित्याचा व विचारांचा प्रसारही करीत असे. बिस्वास हा मूळ पश्चिम बंगालचा असून तो गेल्या काही वर्षांपासून ‘@ShamiWitness’ या नावाने हे खाते चालवत होता, असे बेंगळुरूचे पोलिस आयुक्त एम.एन. रेड्डी यांनी सांगितले.
मेहदी याच्याविरोधात भादंवि तरतुदी, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा व माहिती तंत्रज्ञान कायदा या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मेहदी याचे १७ हजार ट्विटर अनुयायी आहेत व युद्धभूमीवरील घडामोडींचा अभ्यास करून तो ट्विट करीत असे’, अशी माहिती पाछाऊ यांनी दिली. तर, ब्रिटनच्या ‘४ न्यूज चॅनेल’ ने दिलेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेर शनिवारी सकाळी मेहदी याला अटक केली, अशी माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली. मेहदी नावाची एक व्यक्ती बंगळुरू येथून इसिस या जिहादी संघटनेचे ट्विटर खाते चालवित आहे, अशी माहिती ब्रिटनस्थित चॅनेल ४ या वृत्तसंस्थेने दिली होती.
पछाऊ यांनी सांगितले की, मेहदी याला २००३ पासून लेव्हॅनटाइन म्हणजे पूर्व भूमध्य भागाचे आकर्षण होते, त्यात सायप्रस, इस्रायल, जॉर्डन, लेबनॉन, पॅलेस्टाइन, सीरिया व दक्षिण टर्कीचा समावेश होता.
पोलिसांच्या खास पथकाने २४ वर्षांच्या मेहदी याला एका भाडय़ाच्या खोलीतून अटक केली. चॅनेल ४ ला दिलेल्या मुलाखतीत मेहदी याने स्वतचे समर्थन केले तसेच आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचे म्हटले.
आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी बेंगळुरूचा संबंध प्रथमच जोडला गेला आहे असे नाही तर यापूर्वीही असे घडले आहे. २००७ मध्ये लंडन येथील काफिल अहमद हा अभियांत्रिकीतील डॉक्टरेट असलेला विद्यार्थी बेंगळुरू शहरात रहात होता व त्याने ग्लासगो आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोटकांचा ट्रक धडकावला होता व त्यात तो जखमी होऊन मरण पावला होता. किनारी प्रदेशातील भटकल गावचे रियाझ व इक्बाल भटकल यांनी इंडियन मुजाहिद्दीनची स्थापना करून २१ दहशतवादी हल्ले केले होते. अजूनही ते दोघे बेपत्ता आहेत.

मेहदीचे कारनामे
दिवसा तो कार्यालयात काम करीत असे व रात्री इंटरनेटवर सक्रीय असे. महिन्याला ६० जीबीचे इंटरनेट कनेक्शन त्याने भाडय़ाने घेतले होते व त्यात तो इसिस व आयएसएल च्या संकेतस्थळावरील बातम्या वाचत असे. सोशल मीडियावरून मेहदी हा इसिस व इसिससाठी प्रचार मोहीम राबवित असे. मेहदी याने त्याची ओळख लपवली होती, पण चॅनेल ४ ने त्याची ओळख उघड केली व भारतीय संस्थांना माहिती दिली. मेहदीचे आई-वडील पश्चिम बंगालचे असून त्याला दोन मोठय़ा बहिणी आहेत . वडील पश्चिम बंगाल विद्युत मंडळाचे निवृत्त कर्मचारी आहेत. ब्रिटिश वृत्तवाहिनीने त्याची पूर्ण ओळख सांगितली नव्हती, फक्त मेहदी नावाने तो काम करतो असे सांगितले होते. त्याचे ट्विट हे २० लाख लोक दर महिन्याला पाहत होते व इस्लामिक स्टेटचे ते सर्वात प्रभावी खाते होते व त्याला १७७०० अनुसारक होते.

मेहदी याचा बचाव
आपण काही चुकीचे केलेले नाही, कुणाला हानी पोहोचवलेली नाही, कायदा मोडलेला नाही, कुणाविरूद्ध युद्ध छेडलेले नाही, भारतीय लोकांमध्ये हिंसाचार भडकवलेला नाही. भारताच्या मित्र देशांशी युद्ध छेडलेले नाही. आपल्याकडे कुठली शस्त्रे नाहीत. आपण इराक व सीरियात लढायला गेलो नाही आणि त्यामुळेच मी अटकेस विरोध करणार नाही. आपले कुटुंबीय आर्थिकदृष्टय़ा आपल्यावर अवलंबून आहे, असा दावा मेहदी याने केला.

‘इसिस’चे ट्विटरखाते हाताळणाऱ्या मेहदी बिस्वास या तरुणाला बंगळुरू येथून अटक करण्यात आली. त्याचे छायाचित्र दाखविताना बंगळुरूचे तपास अधिकारी हेमंत निंबाळकर.