देशात आणि राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहेत. सोलापूरमधील विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पडले होते. यातच आता बीडमधील राष्ट्रवादीचे जयदत्त शिरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. शनिवारी आमदार जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर बीड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर गुप्त बैठक पार पडली. या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून क्षीरसागर यांनी केलेली वक्तव्य आणि मातोश्री भेट यामुळे त्यांचा शिवसनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधान आले आहे. गुढीपाडव्यानिमित्त मातोश्रीवर जाऊन क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरेंना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मातोश्री भेटीमुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. जर क्षीरसागर यांनी घड्याळाची साथ सोडली तर बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथा पालथ होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर धनजंय मुंडे आणि राष्ट्रवादीवर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या महिन्यात कार्यकर्तांची बैठक बोलवली होती. यावेळी ‘मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,’ असं म्हणत कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपाच्या लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या मदतीची भूमिका घेतली आहे. तरीही आपण कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. याबाबतचा निर्णय १८ एप्रिलला घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यात त्यांनी गुढीपाडव्याला उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.