अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प तीन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प दाम्पत्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात २४ फेब्रुवारी २०२० पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधून होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले एक ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्वीटमध्ये ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा उल्लेख केला आहे.

फेसबुक या समाजमाध्यमावरील लोकप्रियतेत पहिला क्रमांक दिल्याबाबत अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुकचे आभार मानले आहेत. लोकप्रियतेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोघांचाही मोठा सन्मान झाला असल्याच्या भावना ट्रम्प यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, फेसबुक पेजला मिळणाऱ्या लाइकचा विचार केला, तर मी जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहणारा नेता आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला असला, तरीही सत्य मात्र वेगळंचं आहे. ट्रम्प यांच्या अधिकृत पेजवरील लाइकच्या दुप्पट लाइक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत पेजला आहेत, तर फेसबुकवरील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती ही ट्रम्प आणि मोदी यापैकी कोणीच नाही, तर ती व्यक्ती म्हणजे फुटबॉलपटू क्रिस्तिआनो रोनाल्डो आहे.

फेसबुकवर मोदींचे ४४ मिलियनपेक्षा आधिक फॉलोअर्स आहेत. तर ट्रम्प यांचे २६ मिलियन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर मिळणाऱ्या लाइक्सचा विचार केल्यासही ट्रम्प मोदींपेक्षा खूप मागे आहेत. मोदींना मिळणाऱ्या लाइक्सपेक्षा अर्धे लाइक्स ट्रम्प यांना मिळतात. ट्रम्प यांच्या अधिकृत पेजला दोन कोटी ५९ लाख ६७ हजार लाइक्स आहेत. तर मोदींच्या अधिकृत पेजला चार कोटी ४६ लाख २३ हजार लाइक्स आहेत. ट्विटरचा विचार केल्यास ट्रम्पपेक्षा मोदी पिछाडीवर आहे. मोदींना ट्विटरवर ५० मिलियन फॉलोअर्स आहेत तर ट्रम्प यांमा ६४.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

ट्रम्प यांचं ट्विट –
हा मोठा सन्मान आहे. कारण झकरबर्ग यांनी डोनाल्ड ट्रम्प क्रमांक १ वर, तर मोदी क्रमांक दोनवर आहेत. मी दोन आठवडय़ात भारताच्या दौऱ्यावर जात आहे, त्या दौऱ्याकडे मी आशावादी दृष्टिकोनातून पाहत आहे.


मोदींचा अमेरिकेत ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम झाला होता. तसाच अहमदाबादमध्ये ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यावेळी ट्रम्प भारतीयांना संबोधित करतील. जगातील सर्वात शक्तीशाली नेत्याच्या स्वगातासाठी गुजरातमध्ये स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरात सरकारकडून अहमदाबादमध्ये ठिकठिकाणी तयारी सुरू केली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौऱ्यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर विमानतळ ते कार्यक्रम स्थळापर्यंतच्या प्रवासात ट्रम्प यांना झोपड्यांचं दर्शन होऊ नये यासाठी एक मोठी भिंतही उभारण्यात येते आहे.