बिहारच्या मुझफ्फरपूर येथील मुलींच्या वसतीगृहातील बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपा आणि जनता दल संयुक्तवर टीकास्त्र सोडले. ‘बेटी बचाव’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा नसून ती एक धमकीच आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.  भाजपा आणि नितीश कुमार सरकार मुझफ्फरपूरमधील प्रमुख आरोपी ब्रजेश ठाकूरला पाठीशी घालत आहे, असा आरोपही काँग्रेसने केला.

काँग्रेसच्या वतीने शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेण्यात आली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मुझफ्फरपूरमधील बलात्कार, देशातील भ्रष्टाचार आणि आसाममधील एनआरसीवरुन भाजपावर टीकेची झोड उठवली. ‘आसाममध्ये नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदणी यादीवरुन भाजपा समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी सरकारच्या या षडयंत्राला आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला राफेल करारातील आकडेवारी सांगायला का घाबरत आहेत. ‘कर्ज बुडवून फरार होणाऱ्यांचा विकास’ हा मोदी सरकारचा नारा झाला असून बँक घोटाळे करणाऱ्यांना फरार होण्यास भाजपानेच मदत केली, असा आरोप त्यांनी केला. ज्या देशाचे पंतप्रधान २ कोटी तरुणांना रोजगाराचे आश्वासन देतात आणि नंतर पकोडे आणि पान विकण्याचा सल्ला देतात हे चिंताजनक आहे, असे त्यांनी सांगितले.  राफेल घोटाळा असो किंवा बँकेतील घोटाळे, मोदी सरकारच्या काळात झालेले भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्ष लढा देईल, असे त्यांनी सांगितले. ज्या देशाचे पंतप्रधान २ कोटी तरुणांना रोजगाराचे आश्वासन देतात आणि नंतर पकोडे व पान विकण्याचा सल्ला देतात हे चिंताजनकच असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

मुझफ्फरपूर येथील बलात्कार प्रकरणात भाजपा आणि नितीश कुमार सरकार प्रमुख आरोपी ब्रजेश ठाकूरला पाठीशी घालत आहे, असा आरोपही त्यांनी केला. जुमला बाबू (मोदी) आणि सुशासन बाबू (नितीशकुमार) या दोघांनी राज्यात जो अत्याचार होऊ दिला, ते लाजीरवाणे आहे. जुमला बाबू आणि सुशासन बाबू नेमके काय करत होते, असा सवाल काँग्रेसने विचारला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसदेत आणि संसदेच्या बाहेर सरकारविरोधात व्यापक जनआंदोन केले जाईल. याद्वारे मोदी सरकारला जनतेला उत्तर देण्यास भाग पाडले जाईल, असेही सुरजेवाला यांनी सांगितले.