‘भारत बायोटेक’च्या कोव्हॅक्सिन या स्वदेशी लशीला तिसऱ्या चाचणीतील निष्कर्षांआधीच मान्यता देण्यात आल्याने शंका व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर तिच्या पहिल्या टप्प्यातील माहितीचा अभ्यास करता ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, असा निर्वाळा वैद्यकीय जगतातील प्रतिष्ठित ‘लॅन्सेट’ नियतकालिकाने दिला आहे.

‘कोव्हॅक्सिन’मध्ये निष्क्रिय विषाणूचा वापर केला असून तिचे तांत्रिक नाव ‘बीबीव्ही १५२’ आहे. ती सर्व वयोगटातील लोकांसाठी असून तिचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असे ‘लॅन्सेट’च्या संशोधन अहवालात नमूद केले आहे. कोव्हॅक्सिन लशीबाबत दुष्परिणामाचे प्रकार सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे आहेत. पहिल्या मात्रेनंतर दिसणारी लक्षणे सौम्य असू शकतात, गंभीर नाहीत, असे ‘लॅन्सेटच्या अहवालात म्हटले आहे.

या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष हाती आलेले नाहीत. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची प्रक्रिया सुरू आहे. लशीच्या चाचण्यांचे पहिले दोन टप्पे सुरक्षेशी निगडित होते, तर तिसरा टप्पा परिणामकारकतेशी निगडित आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषद व राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था यांच्या सहकार्याने भारत बायोटेकने ही लस हैदराबादमधील प्रकल्पात तयार केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असतानाच तिच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे.

‘मेडआरएक्स ४’ या नियतकालिकाने असेच निष्कर्ष डिसेंबरमध्ये प्रकाशित केले होते. पण आता सार्वजनिक पातळीवर लशीची जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता यांचा अभ्यास करण्यात आला आहे. देशातील ११ रुग्णालयांत या लशीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या करण्यात आल्या असून त्यात १८-५५ वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता.