भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या करोना लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. यामुळे आता सर्वांचं लक्ष लसीकरण मोहीम केव्हा सुरू होते याकडे लागलं आहे. कोव्हॅक्सिनसोबत ‘सीरम’ संस्थेने उत्पादित केलेली ‘कोव्हिशिल्ड’लाही मंजुरी देण्यात आली आहे. यादरम्यान भारत बायोटेककडून एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

भारत बायोटेकला १२ वर्षाच्या पुढील मुलांवर चाचणी करण्यासाठी औषध नियंत्रकांनी परवानगी दिली आहे. भारत बायोटेकसोबत सीरमच्या कोव्हिशिल्ड लसीलादेखील १८ वर्षाच्या पुढील मुलांना चाचणीत सहभागी करुन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अदर पुनावाला यांनी जाहीर केली करोना लसीची किंमत; म्हणाले…

‘‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही करोना लसींच्या मर्यादित आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. “लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षिततेबद्दल थोडीशी शंका निर्माण झाली तरी आम्ही त्यांना मंजुरी देणार नाही,” असं औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी स्पष्ट केलं. “कोव्हिशिल्ड ७०.४२ टक्के परिणामकारक, तर कोव्हॅक्सिन सुरक्षित असून उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण करते,” अशी पुष्टीही सोमानी यांनी जोडली.

‘कोव्हिशिल्ड’ ही लस ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केली आहे. तिचे भारतातील उत्पादन ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था करीत आहे. ‘कोव्हॅक्सिन’ ही स्वदेशी लस आहे. तिचे उत्पादन भारत बायोटेक ही कंपनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने करीत आहे. ‘कोव्हॅक्सिन’ या स्वदेशी लशीला मर्यादित प्रमाणात आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. दोन्ही लशींच्या वापरास अंतिम मंजुरी मिळाल्यामुळे आता लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

लसमान्यतेचे निकष जाहीर करा!

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने दोन्ही लसींच्या चाचण्यांची तपशीलवार माहिती घेतल्यानंतर दोन्ही लसींना मंजुरी देण्याची शिफारस औषध महानियंत्रकांना केली होती. औषध महानियंत्रकांनी करोना तज्ज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे दोन्ही लसींना आपत्कालीन वापराची परवानगी दिली असली तरी ‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरी देताना मर्यादित वापरासाठी परवानगी देत असल्याचे म्हटलं आहे. औषध महानियंत्रक डॉ. सोमाणी म्हणाले की सीरम आणि भारत बायोटेक यांच्या लशींना तज्ज्ञ समितीच्या अहवालाआधारे परवानगी देण्यात आली आहे. लशी दोन मात्रेत द्यायच्या असून त्या २ ते ८ अंश तापमानात साठवून ठेवता येतील.

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन मर्यादित वापरास अंतिम मंजुरी; आता लसीकरणाची प्रतीक्षा

‘सीरम’ने ६ डिसेंबरला, तर भारत बायोटेकने ७ डिसेंबरला लशीला परवानगीसाठी अर्ज केले होते. फायझरनेही ४ डिसेंबरला अर्ज केला असून त्यावर प्रक्रिया चालू आहे. कॅडिला हेल्थकेअर या कंपनीला लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आल्याचेही औषध महानियंत्रकांनी सांगितलं.