बिहारमध्ये बुधवारी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. “बिहारमधील नितीश कुमार यांचं सरकार अहंकारात बुडालेलं आहे. आता या अहंकारी सरकारला बदलण्याची वेळ आली आहे,” असं सोनिया गांधी म्हणाल्या.

“बिहारच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीला मी नमन करते. आज बिहारमधील सत्ता आणि अहंकारात बुडालेलं सरकार आपल्या मार्गावरुन भरकटलं आहे. आज कामगार असहाय्य झाले आहेत. शेतकरीही चिंतेत आहेत. तर तरूण वर्गही निराश आहे,” असं सोनिया गांधी म्हणाल्या. “अर्थव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीचा आज लोकांना त्रास होत आहे. बिहारची जनता आज काँग्रेस महाआघाडीसोबत उभी आहे. आज बिहारची हीच मागणी आहे,” असंही त्या म्हणाल्या. दिल्ली आणि बिहारमधील सरकार बंदी घालणारी आहेत. नोटबंदी, व्यापार बंदी, आर्थिक बंदी, शेती बंदी आणि रोजगार बंदी केली जात आहे. याविरोधात बिहारमधील जनता एकजूट झाली आहे. आता बदल करण्याची वेळ आहे. आता नवे विचार आणि नवी शक्ती निर्माण झाली असून नव्या भारताचा अध्याय लिहिण्याची हीच वेळ असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- Bihar Election : नितीश कुमार शारीरिक, मानसिकरित्या थकलेले म्हणूनच…; तेजस्वी यादवांचा हल्लाबोल

आणखी वाचा- “तुमच्या आईला जाऊन विचारा…”; मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांना नितीश कुमार यांचा सल्ला

बिहारच्या नागरिकांमध्ये गुण, कौशल्य, सामर्थ्य, शक्ती आहे. परंतु बेरोजगारी, स्थलांतर, महागाई आणि उपासमारीसारख्या बाबींमुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. जे आपल्याला बोलता येत नाही त्यांना अश्रूंद्वारे वाट करून दिली जात आहे. गुन्ह्यांच्या जोरावर धोरणं आणि सरकार उभं करता येत नाही. बिहार हा भारताचा आरसा आहे आणि एक आशा आहे. भारताचा विश्वास आहे. बिहार हा भारताची शान आणि अभिमानही असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या.