बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे. बिहारमध्ये सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. अशावेळी तेजस्वी यादव आपल्या विरोधकांवर जोरदार टीका करताना पहायला मिळत आहेत. “नितीश कुमार हे शारीरिक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे ते माझ्याबाबतीत जे काही बोलतील ते माझ्यासाठी आशीर्वादाप्रमाणेच आहेत,” असं म्हणत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना टोला लगावला.

“नितीश कुमार यांनी माझ्याबाबत कोणतेही अपशब्द उच्चारले तरी माझ्यासाठी तो आशीर्वाद आहे. नितीश कुमार हे शारीरिक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे जे मन करेल किंवा ते काहीही बोलले तरी त्यांची प्रत्येक गोष्ट मी आशीर्वाद म्हणून घेतो. यावेळी बिहारनं ठरवलं आहे. रोटी-रोजगार आणि विकासाच्याच मुद्दयावर निवडणुका पार पडणार,” असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नितीश कुमार यांच्यावर टीका केली.

आणखी वाचा- सत्तांतरासाठी हीच योग्य वेळ; सरकारला अहंकारी म्हणत सोनिया गांधींनी घातली मतदारांना साद

आणखी वाचा- “नितीशकुमार दिल्लीत जातील, बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होईल”

भिरकावली होती चप्पल

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यावेळी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली जात असून काही घटनाही समोर येत होत्या. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर चप्पल फेकण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात तेजस्वी यादव काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी उपस्थित असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. तेजस्वी यादव प्रचारसभेसाठी हजर राहिले होते. तेजस्वी यादव मंचावर पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच हा प्रकार घडला होता. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका दिव्यांग व्यक्तीनं त्यांच्या दिशेनं चप्पल भिरकावल्याचं सांगण्यात आलं होतं.