बिहारमध्ये तीन टप्प्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या ‘एनडीए’विरोधात राजदप्रणीत काँग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभं केलं आहे. मतमोजणीनुसार, बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदीत राज यांनी ईव्हीएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

चंद्रावर पाठवण्यात येणारं सॅटेलाइट जमिनीवर नियंत्रित केलं जाऊ शकतं तर मग ईव्हीएम काय चीज आहे असं एएनआयशी बोलताना ते म्हणाले आहेत. “चंद्रावर तुम्ही जे सॅटेलाइट पाठवता ते तुम्ही जमिनीवरुन नियंत्रित करता आणि तिथे काही गडबड झाली तर दुरुस्तीही होऊ शकते. मग ईव्हीएम काय चीज आहे,” असं उदीत राज यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- NDA जिंकली तर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार? भाजपा म्हणते…

पुढे ते म्हणाले की, ‘भाजपा, जेडीयू उमेदवारांना लोक ऐकत नव्हते, मारुन पळवत होते, मोदींच्या रॅली फ्लॉप होत होत्या, नितीश कुमार यांना कोणी ऐकण्यासही तयार नव्हतं आणि अनेक ठिकाणी जनतेन रोष व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत महागठबंधन २०० जागांच्या जवळ पोहोचला तर आश्चर्य व्यक्त होण्याचं कारण नव्हतं. प्रत्येक गल्ली, नाक्यावर विरोध होत असताना मग ही मतं कुठून मिळत आहेत, मला काहीतरी गडबड दिसत आहे”.

आणखी वाचा- Bihar Election Results : “राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवला ते डुबले”

“महागठबंधन जिंकलं तरी मी ईव्हीएम घालवण्यासंबंधी सांगणार आहे. ईव्हीएम गेलंच पाहिजे. निवडणूक आयोग तर भाजपा आयोग झाला आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. याचवेळी उदीत राज यांनी ट्विट केलं असून “अमेरिकेमध्ये जर ईव्हीएमवर निवडणूक झाली असती तर ट्रम्प यांचा पराभव झाला असता का?”, असं म्हटलं आहे.