माध्यान्ह भोजनातून झालेल्या विषबाधेमुळे मृतांची संख्या आता २२ झाली आहे. मंगळवारी सरण जिल्ह्य़ातील एका सरकारी प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला होता. पहिली ते चौथ्या इयत्तेत शिकत असलेली दहा वर्षांखालील सोळा मुले छाप्रा येथे मृत्युमुखी पडली. पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात इतर चार मुलांना मंगळवारी रात्री मृत घोषित करण्यात आले. बुधवारी सकाळी आणखी दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले असून सरण जिल्ह्य़ात लोकांनी निदर्शने केली. शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांच्या कुटुंबीयांसह फरार झाल्या आहेत.  दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मृतांमध्ये माध्यान्ह भोजन प्रकल्पातील पन्नोदेवी या अन्न तयार करणाऱ्या महिलेच्या  दोन मुलांचा समावेश आहे तर मंजू देवी या अन्न तयार करणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या तीन मुलांवर पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. इतर पंचवीस जणांवर रुग्णालयात देखरेख केली जात आहे असे वैद्यकीय अधीक्षक अमरकांत झा आझाद यांनी सांगितले. आजारी मुलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून वरिष्ठ डॉक्टर त्यांची काळजी घेत आहेत.राज्य सरकारने मात्र हा कटाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. मुलांना विषबाधा झाली नाही तर त्यांच्या अन्नात विष मिसळण्यात आले असा आरोप शिक्षण मंत्री पी.के.साही यांनी केला.
मधुबनीतही ५० जणांना विषबाधा
मधुबनी जिल्ह्य़ातील सरकारी शाळेत बुधवारी माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्यामुळे ५० विद्यार्थी आजारी पडले. मधुबनीपासून २२ किमी अंतरावरील बिस्फी येथील नावतोलिया माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना बुधवारी माध्यान्ह भोजन देण्यात आले. या जेवणात मेलेली पाल असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. जेवण घेतल्यानंतर सुमारे ५० विद्यार्थ्यांना पोटात दुखून उलटय़ा होऊ लागल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तातडीने बिस्फी येथील आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र, सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.

केंद्राने अहवाल मागविला
या प्रकरणी केंद्र सरकारने अहवाल मागितला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री एम. एम. पालम राजू यांनी बिहार सरकारला यासंदर्भात आदेश दिले. मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
माध्यान्ह योजनेतील भोजन शाळेतच तयार करण्यात येते आणि मुलांना डाळ, भात, भाजी आणि सोयाबिन देण्यात आले होते, असे राजू यांनी सांगितले. माध्यान्ह भोजन योजना राबविताना ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले आहे किंवा नाही, हे चौकशीनंतर समोर येईल, असे राजू यांनी सांगितले. माध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राजू यांचे मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावते. ठरवून दिलेल्या नियमांनुसार  मुलांना जेवण देण्याआधी प्रौढ व्यक्ती आणि शिक्षकांकरवी जेवण खाऊन तपासले जाते आणि नंतरच मुलांना द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.