आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे काम करण्यासाठी येथील बारावीच्या विद्यार्थ्यांला पाकिस्तानातून दूरध्वनी आला होता असे पोलिसांनी सांगितले.
कैमुर जिल्हय़ातील मुकेश कुमार या विद्यार्थ्यांने भाबुआ पोलीस स्टेशनला याबाबत लेखी तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे, की पाकिस्तानातून आपल्याला आयएसआयचा दूरध्वनी आला होता व त्यांनी आपल्याला त्या संघटनेसाठी काम करण्याचे आमिष दाखवले आहे.
पोलीस अधीक्षक हरप्रीत कौर यांनी सांगितले, की कुमार हा बारावीचा विद्यार्थी असून तो अर्धवेळ कपडय़ाच्या दुकानातही काम करतो. सुरुवातीला त्याने या दूरध्वनीला उत्तर दिले नव्हते, पण पुन्हा दूरध्वनी आला असता पलीकडच्या व्यक्तीने आयएसआयसाठी काम केल्यास भरपूर रक्कम देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर कुमार याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कुमार याने सांगितले, की आयएसआयच्या वतीने बोलणाऱ्या व्यक्तीचा देकार आपण फेटाळून लावला.
कैमुरच्या पोलीस अधीक्षक हरप्रीत कौर यांनी या घटनेची माहिती पाटणा येथील राज्य पोलीस मुख्यालय व गुप्तहेर खाते तसेच इतर संस्थांना दिली आहे.
आयएसआय म्हणजे इंटर सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्स ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था असून, त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा व सक्रिय मदत आहे.