अंतर्गत सुरक्षेला असलेल्या धोक्यांचा कठोरपणे मुकाबला करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका भाजपने केली आहे. काश्मीरमध्ये काल दहशतवाद्यांच्या हल्यात ८ जवान शहीद झाले होते. त्या पाश्र्वभूमिवर भाजपने सरकारला दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी कठोर धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला आहे.
दहशतवादाच्या विरोधात सरकारने कठोर पावले उचचली तर भाजप सरकारच्या पाठिशी राहील यामध्ये राजकारण आणणार नाही असे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सांगितले. सरकार केवळ घोषणा करते कृती मात्र काहीच करत नाही त्यामुळे दहशतवादी कारवाया वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. दहशतवादी कायवायांना पायबंद घालताना सरकारचे सौम्य धोरण आड येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी कठोर धोरण ठेवायला हवे अशी मागणी राजनाथ सिंह यांनी केली.