नवा पक्ष स्थापन केल्यास अखिलेशबरोबर युतीची काँग्रेसची तयारी

समाजवादी पक्षामध्ये चालू असलेल्या घनघोर, तुंबळ ‘यादवी’कडे भाजप व काँग्रेस डोळ्यात तेल घालून पाहत आहे. मुख्यमंत्री अखिलेशसिंहांनी अधिकृतपणे इन्कार केला असला तरी ते स्वतंत्र पक्ष काढण्याची शक्यता भाजप व काँग्रेसमधील अनेकांना वाटते आहे. तसे घडल्यास अखिलेशसिंहांबरोबर युती करण्याचा अनौपचारिक निर्णय काँग्रेसने घेतल्याचे समजते.

‘मुलायमसिंहांच्या या कुटुंबकलहात कोण बाजी मारेल, हे सांगणे कठीण आहे. तडजोम्ड करण्यात मुलायमसिंग यशस्वी जरी झाले तरी दुफळी काही संपणार नाही. इतका तमाशा झाल्यानंतर माघार घेणे कोणालाच परवडणार नाही. पण आमदारांबरोबरच जनतेचीही सहानुभूती अखिलेश यांच्याबाजूने असल्याचे जाणवते. अशास्थितीत ते समाजवादी पक्षातून बाहेर पडण्याची दाट शक्यता वाटते,’ असा अंदाज भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसाने अनौपचारिकपणे व्यक्त केला. समाजवादी पक्षातील या फाटाफुटीचा फायदा बहुजन समाज पक्षाच्या मायावतींना मिळण्याची शक्यता त्याने नाकारली नाही.

अखिलेश हे ‘प्रगतीशील समाजवादी पक्ष’ नावाचा पक्ष स्थापन करतील आणि त्यासाठी (समाजवादी पक्षाच्या ‘सायकल’च्या धर्तीवर) ‘मोटारसायकल’ हे चिन्ह घेणार असल्याची चर्चा खूप दिवसांपासून आहे. मुलायमसिंहांचे बंधू शिवपालसिंह यांनी तसा जाहीर आरोपदेखील केला आहे; पण अखिलेशसिंहांनी त्याचा स्पष्ट इन्कार केला आहे.

दुसरीकडे काँग्रेसचेही घडामोडीवर बारीक लक्ष आहे.

सोमवारी दुपारी महत्वाची बैठक झाली. त्यात उत्तर प्रदेशचे सर्व महत्वाचे नेते सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेशसिंह जर समाजवादी पक्षातून बाहेर पडलेच तर त्यांच्याबरोबर निवडणूकपूर्व युती करण्यावर एकमत झाले. अखिलेशसिंहांची प्रतिमा तुलनेने चांगली असल्याने त्यांच्याबरोबरील युतीचा फायदा होईल, यावर एकमत झाले. याशिवाय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध असल्याकडेही बोट दाखविले जाते.

प्रियाकांच्या उपस्थितीने भुवया उंचावल्या     

सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये प्रियांका गांधी- वद्रा यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. पक्षाच्या अधिकृत बैठकीत उघडपणे सहभागी होण्याचे त्यांनी आतापर्यंत टाळले असल्याने सोमवारच्या उघड सहभागाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीतील त्यांच्या सRिय सहभागाची चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत प्रियांका यांनी स्वत:ला अमेठी व रायबरेलीपुरतेच मर्यादित ठेवले आहे. पण यंदा त्यांना संपूर्ण उत्तर प्रदेशात फिरविण्याचे घाटत आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीचा, म्हणजे १९ नोव्हेंबरचा मूहूर्त काढण्यात आल्याचे समजते.