पश्चिम बंगालमध्ये सीबीआय आणि कोलकाता पोलीस आयुक्तांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी ट्विटरद्वारे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.


आपल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या बचावासाठी ममता बॅनर्जी यांनी जाणूनबुजून संवैधानिक संकट निर्माण केलं असल्याचं सुप्रियो म्हणाले आहेत. तसंच, ममता बॅनर्जी या स्वतः देखील भ्रष्ट असल्याचा आरोप त्यांनी ट्विटरद्वारे केला आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करावे. तृणमुल काँग्रेसचे नेतृत्व भ्रष्टाचारी ममता बॅनर्जी करत आहेत. ममता बॅनर्जी आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी हा संवैधानिक संघर्ष निर्माण करत आहेत, असं ट्विट सुप्रियो यांनी केलंय.

शारदा चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी तपास करण्यासाठी रविवारी संध्याकाळी सीबीआयचे पथक कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र त्यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना रोखण्यात आलं. बंगाल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मध्यरात्री त्यांची सूटका केली. त्यानंतर स्वतः ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलनाला सुरूवात केली.

काल(दि.4) संसदेतही या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. लोकसभेत बोलताना पश्चिम बंगालमध्ये घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याची केंद्र सरकार तयारी करीत असल्याची चर्चा दिल्लीत सुरू आहे.