पालघरमध्ये तीन साधूंची जमावानं चोर असल्याच्या संशयातून हत्या केली होती. या घटनेची देशभरात चर्चा झाली. त्याचबरोबर या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घटना गैरसमजातून झाली असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर या घटनेवर पडदा पडला असतानाच भाजपाचे नेते संबित पात्रा यांनी या हत्याकांडामागे कम्युनिस्ट पक्षाचा हात असल्याचा आरोप केला आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन साधूंची जमावानं हत्या केली होती. गुरुवारी रात्री डहाणू तालुक्यातील गडचिंचले परिसरात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाला गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चोर फिरत असल्याच्या अफवा पसरली होती. त्यातून ही घटना घडल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः स्पष्ट केलं.

दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या घटनेला कम्युनिस्ट पक्षाला जबाबदार धरलं आहे. पात्रा यांनी याविषयी एक ट्विट केलं आहे. “महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात जिथे साधूंची निघृर्णपणे हत्या करण्यात आली. ही घटना डहाणू विधानसभा मतदारसंघात घडली आहे. हा मतदारसंघ सीपीआय (एम)चा गढ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाचा आमदारही कम्युनिस्ट पक्षाचा आहे. या मतदारसंघात सीपीआय (एम) बरोबर राष्ट्रवादीची आघाडी केली आहे. हे हत्याकांड मार्क्सवादी गुंडाचं काम आहे. त्यामुळे पूर्ण डाव्या संघटना गप्प आहेत,” असा आरोप पात्रा यांनी केला आहे.

पालघरमधील घटना गैरसमजातून -मुख्यमंत्री

“पालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद आहे. गेल्या पाच वर्षातही आपल्या राज्यात मॉब लिंचिंग झालं. मुळात जिथे घडलं तो भाग पालघरपासून ११० किमी अंतरावर आहे. दोन साधू दुर्गम भागातून जात होते. तिथे सरळ मार्गाने जाता येत नाही. हे काहीही घडवून आणण्यात आलेले नाही. ते गाव अत्यंत दुर्गम भागात आहे. तिथे काही अंतरावर दादरा नगर हवेली म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची हद्द सुरु होते. तिथे त्यांना अडवलं गेलं, त्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. दादरा नगर हवेलीतही त्यांना प्रवेश नाकारला गेला आणि त्यांना परत पाठवलं गेलं. त्या परिसरात गेले काही दिवस अशी अफवा आहे तिथे चोर फिरत आहेत. त्या सगळ्या गैरसमजातून हा प्रकार घडला,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी आधीच स्पष्ट केलं आहे.