नवी दिल्ली : युतीचा तिढा सोडवण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपामध्ये तडजोड होण्याची शक्यता दिसत असून त्यासंदर्भातील भाजपच्या सुकाणू समितीची मॅरेथॉन बैठक गुरुवारी रात्रीपर्यंत सुरू होती. मात्र या निर्णयाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून परत आल्यानंतर केली जाण्याची शक्यता आहे.

भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली बैठक कुठल्याही मध्यंतराविना रात्रीपर्यंत सुरू होती. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती झाल्यास भाजपच्या वाटय़ाला येणाऱ्या जागांवरील उमेदवार निश्चित करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. रविवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी होणारी सुकाणू समितीची ही अंतिम बैठक होती.

दोन्ही पक्षांनी १३५ जागा लढवाव्यात आणि उर्वरित १८ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा प्रस्ताव शिवसेनेने दिला असला तरी भाजपला १३५ पेक्षा जास्त जागांचा वाटा अपेक्षित आहे. प्रामुख्याने याच मुद्दय़ावर सुकाणू समितीच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते. जागा वाटपांवरून तर्कवितर्क केले जात असले तरी भाजपकडून त्याबद्दल अधिकृत मत व्यक्त करण्यात आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत असून युतीच्या जागावाटपावर याच बैठकीत शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेतल्या. बुधवारी हरयाणा भाजपच्या नेत्यांशीही उमेदवार निश्चितीसाठी झालेली बैठक मध्यरात्री दीड वाजता संपली. त्यानंतर लगेचच गुरुवारी शहा यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांशी विनाविश्रांती चर्चा केली. या बैठकीला भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  मंगलप्रभात लोढा, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, संघटनमंत्री बी. एल. संतोष, व्ही. सतीश, राज्य संघटक विजय पुराणिक आदी नेते बैठकीला उपस्थित होते.