नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नव्या चेहऱ्याची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच बुधवारी भाजपच्या विजयी झालेल्या १२ पैकी १० खासदारांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यातील प्रल्हाद पटेल, दियाकुमारी, नरेंद्र तोमर आदींसह अनेक नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केंद्रीय नेत्यांची पाच तास बैठक झाल्यानंतर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही बुधवारी राष्ट्रीय महासचिवांची बैठक घेतली. मॅरेथॉन बैठका झाल्या असल्या तरी, अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचे समजते.

हेही वाचा >>> भविष्याची रणनीती लवकर निश्चित करावी; नितीशकुमार यांचे इंडिया आघाडीला आवाहन

संविधानाच्या अनुच्छेद १०१ (२) नुसार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १४ दिवसांच्या आत नवनियुक्त सदस्यांना विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे तीनही राज्यांमध्ये आमदारकीची निवडणूक जिंकणाऱ्या भाजपच्या १२ पैकी १० खासदारांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्लाच्या दालनात जाऊन राजीनामे सादर केले. राजस्थानच्या अलवरचे खासदार बाबा बालकनाथ व छत्तीसगडमधील खासदार व केंद्रीयमंत्री रेणुका सिंह हे दोघेही राजीनामा सादर करतील असे सांगण्यात आले. नरेंद्र तोमर, प्रल्हाद पटेल व उदय प्रताप सिंह यांना मंत्रीपदाचाही राजीनामा द्यावा लागेल.

मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये अनुक्रमे शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे व रमण सिंह या ज्येष्ठ नेत्यांकडे पुन्हा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यासंदर्भात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजूनही निर्णय घेतलेला नाही. मोदींच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. त्यामध्ये अमित शहा, जे. पी. नड्डा तसेच, बी. एल. संतोष आदी सहभागी झाले होते. शहा आणि नड्डा यांनी या तीनही राज्यांतील नेत्यांशी चर्चा केली.

राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंसह दियाकुमारी, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनसिंह मेघवाल आदींची नावे चर्चेत आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्यासह नरेंद्र तोमर, प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य शिंदे, कैलास विजयवर्गीय यांच्या नावांची चर्चा केली जात आहे. छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्यासह अरुण साव, रेणुका सिंह यांचीही नावे चर्चेत आहेत.

रेवंत रेड्डींचाही निरोप

तेलंगणामध्ये भावी मुख्यमंत्री रेवंत रेडडी यांनीही बुधवारी संसदेत येऊन खासदारकीची राजीनामा लोकसभाध्यक्ष ओम बिर्लाकडे सुपूर्द केला. रेवंत रेड्डी गुरुवारी हैदराबादमधील जाहीर समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर रेवंत रेड्डी यांनी संसदेत विविध पक्षांच्या खासदार सहकाऱ्यांचाही निरोप घेतला. त्यानंतर रेवंत रेड्डी यांनी नव्या महाराष्ट्र सदनामध्ये जाऊन प्रभारी माणिकराव ठाकरे यांचीही भेट घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp to appoint new faces for cm post of madhya pradesh rajasthan and chhattisgarh zws