बिहार विधान परिषदेच्या २४ जागांसाठी पुढील महिन्यांत निवडणूक होणार असून, त्यासाठी एनडीएचे घटक पक्ष असलेल्या तीन पक्षांच्या प्रमुखांनी एकत्रित प्रचार करण्याचे जाहीर केले आहे. एनडीएच्या घटक पक्षांमध्ये फूट असल्याच्या संशयाला पूर्णविराम देण्याचा नेत्यांचा हा प्रयत्न आहे.
बिहार विधानसभेच्या निवडणुका या वर्षांअखेरीला होणार असून, त्या निवडणुकांची उपान्त्य फेरी म्हणून विधान परिषदेच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. एनडीएचे सर्व उमेदवार निवडून यावेत यासाठी तीनही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित काम करण्याचे ठरविले आहे, असे भाजपच्या मंगल पांडे यांनी सांगितले. या वेळी लोकजनशक्ती पार्टीचे पशुपती पारस आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अरुणकुमार उपस्थित होते.
विधान परिषदेसाठी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात निवडणूक होणार असून, भाजपने १८, लोकजनशक्ती पार्टीने चार आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीने दोन उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. एनडीएच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून आणि जागा वाटपावरून नाराजीचे सूर उमटू लागल्याने शनिवारी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.