हाफिज सईदच्या घराबाहेर पाकिस्तानी लष्करानेच घडवला स्फोट?; कारण ठरली ‘ती’ बाचाबाची

गुरुवारी झालेल्या या स्फोटामध्ये १४ जण जखमी झाले असून चौघांचा मृत्यू झालाय, मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Blast Outside Hafiz Saeed House
पाकिस्तानी लष्करासोबत झालेल्या वादामधून स्फोट घडवण्यात आल्याची शक्यता. (फोटो सौजन्य : रॉयटर्स)

पाकिस्तानमधील लाहोरमधील जौहर टाऊन येथील अकबर चौकात मुंबईत झालेल्या २६/११ बॉम्ब हल्ल्यांच्या मुख्य सुत्रधार असणाऱ्या हाफिज सईदच्या घराबाहेर गुरुवारी मोठा स्फोट झाला. हा स्फोट पाकिस्तानी लष्कराचे घडवून आणल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या बॉम्ब ब्लॉस्टचा संबंध पाकिस्तानी लष्कराशी असल्याचं संकेत मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ताशकीर-ए-जबल नावाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून एक मोहिम हाती घेण्यात आली होती. डोंगराळ भागांमधील युद्ध अभ्यासाच्या नावाखाली ही राबवण्यात आलेल्या या मोहिमेच्या आधी झालेल्या एका वादामधून हाफिजच्या घराबाहेर स्फोट घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. गुरुवारी झालेल्या या स्फोटामध्ये १४ जण जखमी झाले असून चौघांचा मृत्यू झालाय, मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >>पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना दिलं जातं पेन्शन; UNHRC मध्ये भारताचा पाकवर हल्लाबोल

पाकिस्तानच्या या योजनेची कल्पना आल्यानंतर भारतीय लष्कराने त्यांच्या या डोंगराळ भागातील युद्ध अभ्यासादरम्यान सीमेवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पुंछजवळच्या सीमाभागात विशेष तुकडी तैनात केली. २६ मे ते १० जून दरम्यान पुंछ सेक्टरमधील पार रावला कोट, टोली पीर परिसरामध्ये पाकिस्तानी लष्कराने हा लष्करी युद्ध सराव केला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कराचं ताशकीर-ए-जबल हे ऑप्रेशन अजूनही सुरु आहे. सध्या हे ऑप्रेशन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये राबवलं जात आहे. पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहे.

नक्की पाहा >> Video: फाईल्सने हल्ला, शिव्या, आरडाओरड अन्… पाकिस्तानी संसदेतील गोंधळाचे झाले Live टेलिकास्ट

भारताने एलओसीवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात केल्याने पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झालेत. तसेच काश्मीरच्या खोऱ्यामध्ये मागील काही काळापासून परिस्थिती सामान्य होत आहे. असं असल्यानेच पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय अस्वस्थ झालेत. कोणत्याही परिस्थितीत काश्मीरच्या खोऱ्यामध्ये अशांतता पसरवण्याचा आयएसएआय आणि पाकिस्तानी लष्कराचा प्रयत्न आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची ही ऑप्रेशन ताशकीर-ए-जबल मोहीम आणि लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि जागतिक स्तरावर दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या हाफिज सईदच्या घराबाहेर झालेला स्फोट यामध्ये थेट संबंध आहे.

नक्की वाचा >> Coronavirus: भारताच्या मदतीसाठी पाकिस्तानी संस्थांनी गोळा केले कोट्यावधी रुपये दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाण्याची भीती

सुत्रांच्या हवाल्याने न्यूज १८ ने दिलेल्या माहितीनुसार, ताशकीर-ए-जबलची सुरुवात करण्याआधी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांची पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये लश्करच्या काही वरिष्ठ कमांडर्सला पाकिस्तानी लष्कराने काश्मीरच्या खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी कमी का झालीय अशासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. मागील दीड वर्षामध्ये काश्मीरमध्ये कोणताही मोठा हल्ला का करण्यात आला नाही?, असा प्रश्नही पाकिस्तानी लष्कराने उपस्थित केला. याला उत्तर देताना लश्करच्या कमांडर्सने आर्थिक चणचण असल्याचं कारण दिलं. यावरुनच पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि लश्करच्या कमांडर्समध्ये आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने लश्करच्या कमांडर्सला खोटी कारणं न देता जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी कशी करता येईल यासंदर्भातील माहिती द्यावी असं सांगितलं. या वादानंतर काही दिवसांनी ऑप्रेशन ताशकीर-ए-जबल सुरु करण्यात आलं.

नक्की वाचा >> कुलभूषण जाधव यांना फाशीविरोधात मागता येणार दाद; पाकिस्तानातील सुधारित कायद्याचा लाभ

पाकिस्तानी लष्कर आणि लश्करच्या कमांडर्समध्ये झालेल्या या बाचबाचीच्या पार्श्वभूमीवरच गुरुवारी हाफिज सईदच्या घाराबाहेर घडवण्यात आलेल्या स्फोटाचं कनेक्शन असल्याचं सांगण्यात येत आहे. लष्करासोबत झालेल्या वादानंतर हाफिजला धडा शिकवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी लष्कराने हा स्फोट घडवून आल्याची चर्चा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Blast outside hafiz saeed house pakistan army connection scsg