सोमालियाची राजधानी मोगादिशूनजीकच्या एका हॉटेलजवळ एका आत्मघातकी कारबॉम्बरने सोमवारी स्वत:ला उडवून दिल्यामुळे किमान सहा जण ठार, तर चार जण जखमी झाले. वर्दळीच्या माका अल्मुकर्रमा रस्त्यावरील वेहेलिये हॉटेलजवळ या हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या.

कुणीही अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. अल-कायदाशी संलग्न असलेल्या अल-शबाब या इस्लामी अतिरेकी संघटनेने यापूर्वी मोगादिशूतील हॉटेल्सला लक्ष्य केले आहे. गेल्या जानेवारी महिनाअखेर अशाच एका हल्ल्यात किमान २६ लोक मरण पावले होते.

सोमवारी सकाळी झालेल्या दुसऱ्या एका स्फोटात एका आत्मघातकी बॉम्ब हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली एक मिनी बस राजधानीच्या दक्षिणेकडील लष्करी तळाच्या प्रवेशद्वाराजवळ उडवून दिली. यात हा बॉम्बर ठार झाला, तर इतर दोघे जखमी झाले.

 

हैतीतील अपघातात ३८ ठार

(हैती) : अपघातानंतर पळून जाण्याच्या चालकाच्या प्रयत्नात एक भरधाव बस उत्तर हैतीत रस्त्यावरील संगीतकारांच्या समूहात शिरल्याने ३८ लोक ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हैतीची राजधानी पोर्ट-ओ-प्रिन्सच्या वायव्येला सुमारे १५० किलोमीटर अंतरावरील तीन लाख लोकसंख्येच्या गोनेव्हेज शहरात झालेल्या या अपघातात आणखी १३ लोक जखमी झाले.या ब्ल्यू स्काय बसने आधी दोन पादचाऱ्यांना धडक दिली. यात एक जण ठार, तर दुसरा जखमी झाला. नंतर चालकाच्या पळून जाण्याच्या प्रयत्नात ही बस रस्त्यावरील संगीतकारांच्या तीन गटांमध्ये शिरली. यात ३८ लोक ठार झाले. अपघातस्थळी भीषण रक्तपात झालेला दिसत होता.

सुरुवातीला जखमींची संख्या १७ असल्याचे सांगण्यात आले, मात्र नंतर त्यापैकी चौघे रुग्णालयात मरण पावले, असे राष्ट्रीय पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागले.

 

ग्वाटेमाला आश्रमशाळा आगीतील मृतांची संख्या ४० वर

ग्वाटेमाला सिटी : ग्वाटेमालातील मुलांसाठी असलेल्या एका सरकारी आश्रमशाळेत लागलेल्या भीषण आगीत जळून जखमी झालेली आणखी एक मुलगी मरण पावल्यामुळे या दुर्घटनेतील बळींची संख्या ४० झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

राजधानी ग्वाटेमाला सिटीच्या पूर्व सीमेवरील सॅन जोस पिनुला या खेडय़ातील ‘अ‍ॅझम्पशन सेफ होम फॉर चिल्ड्रन’मध्ये शुक्रवारी लागलेल्या या आगीत १९ मुली तत्काळ मरण पावल्या होत्या. होरपळून गंभीर जखमी झालेल्या इतर काही तासांनी किंवा दिवसांनी मरण पावल्या. मरण पावलेल्यांपैकी सर्वजण १४ ते १७ वर्षे वयोगटातील मुली होत्या. या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांकडून लैंगिक शोषण व इतर गैरप्रकारांचा निषेध करण्यासाठी या मुलींनीच ही आग लावली असल्याचा दाट संशय आहे.

 

झोपडीला लागलेल्या आगीत चार लहान मुली होरपळून मृत्युमुखी

अहमदाबाद : सुरत जिल्ह्य़ातील एका खेडय़ात झोपडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने चार अल्पवयीन मुली जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे घडली.

ही घटना मुलाड खेडय़ात घडली. भाजी विक्रेते असलेले रमेश पटेल हे बाहेर असताना, टिनाच्या पत्र्यापासून बनलेल्या त्यांच्या झोपडीला आग लागली. यात दर्शना (१०), मानसी (९), तेजश्री व राजश्री (दोघीही ८) या मुली जळून मरण पावल्या. घरगुती गॅसच्या सिलिंडरमधून गळती झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पटेल यांची पत्नी काही वर्षांपूर्वी मरण पावल्यानंतर पटेल हे त्यांच्या चार मुलींसह या झोपडीत राहत होते. रोजच्याप्रमाणे ते सकाळी दाराला बाहेरून कुलूप लावून सुरत शहरात भाजी विकण्यासाठी निघून गेले होते. मुली झोपेत असतानाच गॅस गळतीमुळे आग लागली. मुली बाहेर पडू शकण्यापूर्वीच त्या सर्व जळून खाक झाल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.