भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांपैकी एक असलेला ‘तिरंगा’ अर्थात ‘राष्ट्रध्वज’ हा प्रत्येक भारतीयाचा गौरव आहे. राष्ट्रध्वज हा भारतीयांच्या इच्छा आकांक्षांचे प्रतिक असून याच्या सन्मानासाठी आपल्या जवानांसह अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने देखील राष्ट्रध्वजाचा सन्मान राखायला हवा. यासाठी संविधानात नियमावली अर्थात ध्वजसंहिताही सांगण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणांनिमित्त घरं, शाळा, सरकारी-खासगी कार्यालये, सर्व प्रकारच्या घटनात्मक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकावला जातो. २००४ मध्ये सुप्रीम कोर्टाने या संदर्भात दिलेल्या एका निकालानुसार, राष्ट्रध्वाजाचा गौरव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे राष्ट्रध्वज फडकावण्याचा अधिकार आहे. भारतीय संविधानाच्या कलम १९ (१) अ नुसार, राष्ट्रध्वज फडकावणे हा नागरिकांच्या महत्वाच्या अधिकारांपैकी एक आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी तो फडकावण्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. तीन भागात ही ध्वजसंहिता सांगितली जाते.

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…

ध्वजसंहितेच्या पहिल्या भागानुसार, राष्ट्रध्वज कसा असावा याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, राष्ट्रध्वजात वरच्या बाजूला केशरी, मध्यभागी पांढऱ्या तर खाली हिरव्या रंगाच्या एकाच आकाराच्या पट्ट्या असाव्यात. तसेच पांढऱ्या रंगामध्ये मध्यभागी गडद निळ्या रंगाचे २४ आऱ्यांचे अशोक चक्र असावे. या राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असून त्याचे प्रमाण ३ : २ असे असणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज लोकरी, सुती, खादी कपड्यांमध्ये बनवले जाऊ शकतात.

ध्वजसंहितेच्या दुसऱ्या भागानुसार, राष्ट्रध्वज कसा ठेवावा तसेच फडकवावा याची माहिती आहे. त्यानुसार, राष्ट्रध्वज नेहमी उंच ठिकाणी सर्वांना दिसेल अशा जागी फडकवायला हवा. सार्वजनिक इमारतींवर सुर्योदयानंतर फडकवून सुर्यास्तापूर्वी तो खाली उतरवला पाहिजे. सुर्यास्तानंतर राष्ट्रध्वज फडकावला जाता कामा नये. राष्ट्रध्वजाला उत्साह आणि स्फुर्तीने हळू-हळू खांबावर चढवण्यात यावा. तसेच त्याच गतीने तो खाली उतरवायला हवा. राष्ट्रध्वजाला केशरी रंग खालच्या बाजूला येईल अशा उलट्या पद्धतीने फडकावणे गुन्हा मानला जातो. फाटलेल्या आणि खराब झालेल्या अवस्थेतील राष्ट्रध्वज फडकावणे गुन्हा ठरतो. राष्ट्रध्वज नेहमी स्वच्छ धुतलेला आणि व्यवस्थित इस्त्री केलाला असावा. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा खांब वाकलेल्या अवस्थेत असता कामा नये. राष्ट्रध्वजाचा उपयोग कोणत्याही उत्सवात सजावटीसाठी करता कामा नये. जमिनीला राष्ट्रध्वजाचा स्पर्श होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा कोणत्याही जाहीरातीत अंगावर घालण्यासाठी, नेसण्यासाठी किंवा त्याचा चादरीसारखा वापर करता येत नाही. राष्ट्रध्वजाला फाडणे, खराब करणे किंवा जाळले जाता कामा नये. फाटलेला किंवा जुना झालेला राष्ट्रध्वज एकांतात योग्य पद्धतीने जाळून किंवा अन्य प्रकारे नष्ट केला जायला हवा. राष्ट्रध्वजाला आकर्षक बनवण्यासाठी त्यावर कोणत्याही प्रकारची कलाकुसर केली जाता कामा नये.

ध्वजसंहितेच्या तिसऱ्या भागानुसार, देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सशस्त्र दालांचे जवान किंवा संविधानिक पद्धतीने निवडून आलेले लोकप्रतिनिधी, सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी अशा व्यक्तींच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावेळी नियमानुसार राष्ट्रध्वजातून त्यांचे पार्थिव नेण्यास परवानगी आहे. मात्र, अंत्यविधीपूर्वी राष्ट्रध्वज त्यांच्या पार्थिवापासून वेगळा करणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वजाला सलामी देताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहणे आवश्यक आहे. तर गणवेशधारी सुरक्षा रक्षकांना राष्ट्रध्वजाला हाताने सल्युट देता येतो. इतर देशांच्या राष्ट्रध्वजांसोबत भारताचा राष्ट्रध्वज फडकावताना तो नेहमी उजव्या बाजूला तर प्रेक्षकांच्या डाव्या बाजूला असायला हवा. संविधानिक पदांवर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या वाहनांवर समोर लहान स्वरुपातील राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी आहे. देशाच्या प्रमुख संविधानिक पदांवर काम करीत असलेल्या किंवा केलेल्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यास राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो. त्यासाठी तो आधी पूर्णपणे वरपर्यंत फडकावून नंतर अर्ध्यावर आणला जातो.

ऱाष्ट्रध्वजाचा अपमान झाल्यास नॅशनल ऑनर अॅक्ट १९७१ नुसार, राष्ट्रध्वज जमीनीवर ठेवल्यास तो गुन्हा ठरतो. त्यामुळे पहिल्यांदा असा गुन्हा घडल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड भरावा लागू शकतो. तसेच पु्न्हा असा गुन्हा घडल्यास कमीत कमी एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.