‘बीएमडब्ल्यू’ या जगप्रसिद्ध कार निर्माती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) हॅराल्ड क्रूगर मंगळवारी एका ‘ऑटो-शो’मधील परिषदेत माध्यमांना माहिती देत असताना मंचावरच कोसळले. ‘फ्रँकफूर्ट ऑटो शो’मध्ये हा प्रसंग घडला. ‘बीएमडब्ल्यू’च्या नवीन कार संदर्भात माध्यमांना माहिती देण्यासाठी हॅराल्ड मंचावर दाखल झाले. मात्र, सादरीकरण सुरू होऊन पाच मिनिटांच्या आतच हॅराल्ड अस्वस्थ होऊन मंचावरच कोसळले. उपस्थित सहकाऱयांनी हॅराल्ड यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांना उचलले आणि त्वरित उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर ‘बीएमडब्लू’च्या प्रवक्त्याने कार्यक्रमाची सुत्रे हाती घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून हॅराल्ड परदेश दौरे करीत असून त्यांची तब्येत ठीक नव्हती तरीही त्यांनी या महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता, असे प्रवक्त्याने यावेळी सांगितले.
दरम्यान, हॅराल्ड यांना अशक्तपणामुळे चक्कर आली असून चिंता करण्यासारखे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच हॅराल्ड यांना काही दिवस सक्तीचा आराम करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.