भारताचे माजी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल ब्रार यांच्यावर गतवर्षी लंडन येथे झालेला प्राणघातक हल्ला हा बदल्याच्या भावनेतूनच केला गेला होता. इतकेच नाही तर या हल्ल्यापूर्वी ब्रार यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती, असा खुलासा इंग्लंडच्या साऊथवर्क क्राऊन न्यायालयात करण्यात आला आहे.
१९८४ साली भारतातील अमृतसर येथे सुवर्णमंदिरात झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारमधील सक्रियतेमुळेच लेफ्ट. जन. ब्रार यांच्यावर डूक धरला गेला. लंडनमध्ये त्यांच्यावर पाळत ठेवली गेली आणि नियोजनपूर्वक प्राणघातक हल्ला करण्यात आला, असे सरकारी वकील अ‍ॅनाबेल डारलॉ यांनी सांगितले. आज ब्रार हे निवृत्त झाले असले तरीही सेवाकाळात त्यांनी दहशतवाद्यांविरोधात केलेल्या अनेक मोहिमांमुळे ते शीख दहशतवाद्यांचे लक्ष्य होते, अशी माहितीही डारलॉ यांनी न्यायालयास दिली. या प्रकरणाच्या खटल्यावरील सुनावणीची सुरुवात मंगळवारपासून झाली. या प्रकरणात दोन शीख पुरुष आणि एक महिला यांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. मनदीप सिंग संधू (३४), दिलबाग सिंग (३६) आणि हरजित कौर (३८) अशी त्यांची नावे आहेत.