गुजरातमधील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशामुळे नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची उमेदवारी आणखी प्रबळ झाल्याचे चित्र आहे. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराची धुरा मोदींच्या खांद्यावर द्यावी, यासाठी पक्ष नेतृत्त्वावरील दबाव वाढला आहे. या आठवड्याच्या अखेरिस गोव्यामध्ये होणाऱया पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत गुजरातमधील यशाचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
गुजरातमधील लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला निर्विवाद विजय मिळाला. त्याचवेळी बिहारमधील महाराजगंजमधील निवडणुकीत संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराचा राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवाराने पराभव केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तरीही त्यांना या निवडणुकीत हार पत्करावी लागली. या पार्श्वभूमीवर मोदींच्या यशाला राष्ट्रीय राजकारणा आणखी महत्त्व प्राप्त झालंय.
मुख्यमंत्र्यांच्या परिषदेसाठी मोदी बुधवारी राजधानी नवी दिल्लीमध्ये होते. यावेळी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याशी बंद खोलीमध्ये चर्चा केली. त्यानंतर त्यांनी लालकृष्ण अडवानी यांच्याशीही फोनवरून संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आता कोणतीही अडचण उरलेली नाही, असे पक्षाच्या संसदीय मंडळातील एका नेत्याने सांगितले.