केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीत घोषणाबाजी झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान ‘देशाच्या गद्दारांना गोळ्या घाला’ तसंच ‘आम्ही स्वातंत्र्य मिळवून देऊ’ अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपाने मात्र या घोषणांचा पक्षाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपण किंवा पक्ष अशा घोषणांचं समर्थन करु शकत नसल्याचं सांगितलं आहे. भाजपा आरोग्य, पाणी, स्वच्छता तसंच विकासाच्या मुद्द्यांवर दिल्ली विधानसभा निवडणूक लढवत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

अमित शाह आणि मनोज तिवारी स्थानिक उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी रोड शो करत असताना या घोषणा देण्यात आल्या. सुधारित नागरिकत्व विधेयकावरुन (सीएए) उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर बोलताना मनोज तिवारी यांनी सांगितलं की, “संपूर्ण देश सीएएला समर्थन देत आहे. मात्र काहीजण मुद्दाम विरोध दर्शवत आहेत”.

सीएएविरोधी घोषणा दिल्याने तरुणाला मारहाण
दरम्यान रविवारी अमित शाह यांच्या रॅलीत एका तरुणाने सीएएविरोधात घोषणाबाजी केली असता उपस्थितांकडून त्याला मारहाण करण्यात आली. अमित शाह यावेळी तिथेच उपस्थित होते. त्यांनी सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यांना तरुणाला सुरक्षितपणे तेथून घेऊन जाण्याचा आदेश दिला.

बाबरपूर विधानसभा मतदारसंघात अमित शाह यांची रॅली सुरु असताना चार ते पाच तरुणांनी सीएए रद्द करा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी एका तरुणाला घेराव करत मारहाण केली.

अमित शाह यांनी यावेळी बोलताना आम आदमी आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. “नरेंद्र मोदींनी सीएए आणलं पण राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि कंपनी त्याचा विरोध करत आहेत. त्यांनी लोकांना भडकवत असून दिशाभूल करत आहेत. बसेस, कार जाळल्या जात आहेत. हेच लोक परत आले तर दिल्ली सुरक्षित राहणार नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.