कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी सोमवारी निवृत्ती घेतली. यावेळी त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचं जाहीर केलं. चित्तरंजन दास यांचं हे भाषण चांगलंच चर्चेत आलं. गेल्या काही वर्षांपासून ते कोलकाता उच्च न्यायालयात होते. त्याआधी ते ओडिशा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “काही लोकांना हे आवडणार नाही. पण मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होतो. हे मला या ठिकाणी मान्य करावे लागेल.” त्यानंतर त्यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत ‘आरएसएसशी असलेलं आपलं नातं न सांगणं म्हणजे ढोंग होईल’, असं म्हणत आपण केलेल्या विधानावर ते ठाम असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. टाईम्स ऑफ इडियाने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

चित्तरंजन दास काय म्हणाले?

“निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मी जे बोललो ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत उत्स्फूर्तपणे माझ्या मनात आलं आणि मी त्याबद्दल बोललो. मी माझ्या आयुष्यात असलेल्या लोकांचे आभार मानले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेलं नातं सांगितलं नसतं तर ते म्हणजे ढोंग झालं असतं. देवाने मला आरएसएसवर बोलण्याची प्रेरणा दिली. आरएसएस हे माझं मूळ आहे. पण मी ३७ वर्षांपूर्वी त्यापासून वेगळे झालो होतो. मात्र, मी जर ते स्वीकारलं नसतं तर हा ढोंगीपणा झाला असता”, असं चित्तरंजन दास यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य, “पंतप्रधान नरेंद्र मोदीच फक्त राहुल गांधींची टिंगल करतात, पण देश…”

निरोप समारंभात काय म्हणाले होते?

“काही लोकांना हे आवडणार नाही. मात्र, आज या ठिकाणी सांगू इच्छितो की, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होतो. मी त्या संघटनेला खूप काही देणे लागतो. मी संघाचा खूप ऋणी आहे. मी लहानपणापासून ते मोठा होईपर्यंत तेथे होतो. धाडस, प्रामाणिकपणा, सारखा दृष्टीकोन, देशभक्ती, कामाची भावना हे सर्व मी तेथे शिकलो. मात्र, माझ्या कामामुळे ३७ वर्षांपासून आरएसएसपासून दूर आहोत. त्याचा उपयोग मी कधी माझ्या कारकि‍र्दीत केला नाही. मी संघाच्या सदस्यत्वाचा वापर करून प्रगती केली नाही. कारण ते माझ्या तत्वांच्या विरुद्ध आहे. सगळ्यांना समान वागणूक दिली. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, साम्यवादी असो किंवा भाजपाचा, काँग्रेसचा किंवा तृणमूल काँग्रेसचा सदस्य असो, अशा सर्वांना समान वागणूक दिली”, असं चित्तरंजन दास यांनी आपल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात म्हटलं आहे.