कॅनडामध्ये राहणाऱया एका अनिवासी भारतीयाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा जीवे मारण्याची धमकी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. गगन विधू असे नाव असलेल्या या व्यक्तीने ‘अण्णा हजारे यांना मारण्याची वेळ आली आहे. आपण लवकरच नथूराम गोडसे बनणार आहोत’ अशी पोस्ट गेल्या महिन्यात २४ तारखेला प्रसिद्ध केली होती. याबद्दल माहिती मिळाल्यावर अण्णा हजारे यांच्या कार्यालयाने ठाणे पोलीसांकडे तक्रार दाखल केली असून, राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
पोलीसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार गगन विधू याने २४ फेब्रुवारीला दुपारी ही धमकीवजा पोस्ट प्रसिद्ध केली. त्या पोस्टला तीन जणांनी लाईक केले असून, काही जणांनी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. त्यानंतर २५ फेब्रुवारीला विधू याने आपण कोणतीही गंमत करीत नसून, लवकरच भारतात येणार असल्याचे म्हटले आहे. भारतात आल्यावर बंदूक घेऊन या मॉडर्न गांधी संपवून टाकू, असेही त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांच्या मला खूप राग येतो, त्यांना आयुष्यातून उठविण्यासाठी आपण काहीही करू शकतो. लवकरच आपण त्यांचा भांडाफोड करणार असल्याचेही विधू याने म्हटले आहे.