कॅनडामध्ये एका मुस्लिम कुटुंबाची हत्या करण्यात आली आहे. रविवारी एक पिकअप ट्रक नियम तोडून रस्त्यावर आला आणि मुस्लिम कुटुंबाच्या अंगावर घालून हत्या केली. इस्लामविरोधात द्वेष असल्याने जाणुनबुजून अंगावर वाहन घालून ही हत्या करण्यात आल्याचं कॅनडा पोलिसांनी सांगितलं आहे. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“हे पूर्वनियोजित आणि द्वेषापासून प्रेरित असल्याचे पुरावे हाती लागले आहेत,” अशी माहिती डिटेक्टिव्ह सुप्रिटेंडंट पॉल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मुस्लिम असल्याने कुटुंबाला टार्गेट करण्यात आलं असं प्रथमदर्शी समोर येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

२० वर्षीय तरुणाला अटक

पोलिसांनी या हत्येप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीने ट्रकने कुटुंबावर जोरदार धडक दिली आणि नंतर तेथून पळ काढला अशी माहिती साक्षीदारांनी दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपी लंडनचा स्थानिक असून त्याच्याविरोधात फर्स्ट डिग्री हत्या आणि एक हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पीडितांची ओळख जाहीर नाही

पीडितांची ओळख उघड करु नये अशी विनंती कुटुंबाने केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र पीडितांचं वय पोलिसांनी सांगितलं असून यामध्ये ७४ आणि ४४ वर्षीय महिला. ४६ वर्षीय पुरुष आणि १५ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. हल्ल्यात नऊ वर्षांचा मुलगा वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनीदेखील याप्रकरणी संतपा व्यक्त केला असून आपल्या देशात इस्लामविरोधी द्वेषाला कोणतंही स्थान नसल्याचं म्हटलं आहे. हा द्वेष कपटीचा आणि तिरस्कारदायक आहे आणि तो थांबलाच पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.

आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा कोणत्याही द्वेषसंबंधी गटाचा तो सदस्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. २०१७ मध्ये क्युबेक शहरातील मशिदीत हल्लेखोराने गोळ्या झाडून सहा जणांची हत्या केल्यानंतरचा हा सर्वात भीषण हल्ला असल्याचं बोललं जात आहे. लंडनचे मेयर होल्डर यांनीदेखील ही भीषण हत्या असल्याचं म्हटलं आहे. एकाच कुटुंबातील तीन पिढ्या गेल्या असल्याचं सांगत होल्डर यांनी घटनेप्रकरणी शोक आणि संताप व्यक्त केला आहे.