जगभरातील अनेक देश सध्या करोनाविरोधात लढा देत आहेत. अनेक देशांमध्ये हजारो लोकांचा करोनामुळे मृत्यू झालाय तर करोनाची बाधा झालेल्यांची संख्या लाखांमध्ये आहे. करोना लसीकरणाच्या माध्यमातून आता या साथीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जगभरातील अनेक देश करत असतानाच वैज्ञानिकांनी आणखीन एक धोक्याचा इशारा दिला आहे. करोना विषाणूप्रमाणेच एक बुरशी जागतिक स्तरावर करोनापेक्षा भयंकर साथ निर्माण करु शकते असं वेज्ञानिकांनी म्हटलं आहे. कॅण्डीडा ऑरिस असं या बुरशीचं नाव असून ही मानवासाठी अत्यंत घातक असल्याचे सांगितले जात आहे.

द सन या वृत्तपत्राने सेंटर्स ऑफर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन या आरोग्य नियंत्रक संस्थेमधील वैज्ञानिकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार कॅण्डीडा ऑरिस ही बुरशी ब्लॅक प्लेग प्रमाणेच आहे. ब्लॅक प्लेगला ब्यूबॉनिक प्लेग असंही म्हणतात. ब्यूबॉनिक प्लेगचे काही रुग्ण मागील काही महिन्यांमध्ये चीनमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

नक्की वाचा >> Black Death नावाने ओळखला जाणारा ब्यूबॉनिक प्लेगची लक्षणं काय?, संसर्ग कसा होतो?; जाणून घ्या

…म्हणून अधिक घातक

कॅण्डीडा ऑरिस या बुरशीच्या माध्यमातून करोना इतकी किंवा त्याहून मोठी संसर्गाची साथ परसण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त करण्यामागील मुख्य कारण म्हणजे ही बुरशी खूप वेगाने पसरते. या बुरशीचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला अंत्यंत वेगाने होते. या बुरशीला वैज्ञानिक परफेक्ट पॅथोजेन म्हणजेच रोग आणि संसर्ग पसरवणारा उत्तम वाहक असं म्हणतात. धक्कादायक बाब म्हणजे या बुरशीमध्ये सतत बदल होत असतात. ही बुरशी अनेक औषधांविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करुन स्वत:मध्ये बदल करत असते. त्यामुळे यावर औषधांचा फारसा परिणाम होत नाही.

संसर्ग झाल्यास…

कॅण्डीडा ऑरिस या बुरशीचा संसर्ग झाला तर तीचा थेट रक्तप्रवाहावर परिणाम होतो. जर या बुरशीचे रक्तामधील प्रमाण वाढले तर ते प्राणघातक ठरु शकते. जर ही बुरशी रुग्णालयामधील एका वैद्यकीय उपकरण कींवा शस्त्राच्या माध्यमातून शरीरामध्ये शिरली तर ती अधिक घातक असते. रुग्णालयामध्ये या बुरशीचा मोठ्या प्रमाणात फैलावर झाला तर धोका अधिक वाढू शकतो अशी भिती वैज्ञानिकांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये जुलै महिन्यात करोनावर उपचार घेणाऱ्या ४० जणांना कॅण्डीडा ऑरिसचा संसर्ग झाल्याची माहिती अमेरिकन सरकारच्या अहवालामध्ये आहे. त्यानंतर पुढील महिन्यामध्येही ३५ जणांना कॅण्डीडा ऑरिसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं होतं.

जास्तीत जास्त काळ जिवंत राहण्याची क्षमता

लंडनमधील एम्परल कॉलेजमध्ये साथरोगतज्ज्ञ असणाऱ्या जोहाना रोऱ्हड्स यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅण्डीडा ऑरिस या बुरशीमध्ये कोणत्याही पृष्ठभागावर स्वत:ला जास्तीत जास्त काळ जिवंत ठेवण्याची क्षमता आहे. २०१६ मध्ये लंडनमध्ये या बुरशीचा संसर्ग होऊ नये यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गटामध्ये जोहाना यांचा समावेश होता. या बुरशीचा संसर्ग माकड्यांच्या माध्यमातूनही होत असल्याने या संसर्गाची तुलना बॅक प्लेगशी केली जाते असंही जोहाना यांनी सांगितलं.

अशा अनेक साथी येणार

करोनाच्या साथीमुळे जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील आरोग्य व्यवस्थेमधील दोष समोर आले असून आरोग्याच्या बाबतीत अनेक देशांचे दावे किती खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत हे दिसून आलं. भविष्यात करोनासारख्या वेगवेगळ्या विषाणुंची साथ अनेकदा येईल अशा इशारा आरोग्यविषयक तज्ज्ञांनी दिला आहे. जागतिक वातावरण बदलामुळे विषाणुंचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढणार असल्याचेही तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच आता आरोग्यव्यवस्थांना बळकटी देण्यासाठी प्राधान्य देणं गरजेचं झालं आहे.