आपल्या भोवताली अनेक घटना घडत असतात. ज्यामध्ये गुन्हेगारी घटनांचाही समावेश आहे. देशातील गुन्हेगारीची टक्केवारी घटण्याऐवजी वाढतच चालली आहे. असं असताना, अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड भागातून समोर आली आहे.

पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती

उत्तर कन्नड जिल्ह्यातील दंडेली तालुक्यातील हलमाडी गावामध्ये रहिवाशी असलेल्या एका ३२ वर्षीय महिलेने पतीबरोबर भांडण झाल्यानंतर आलेल्या तणावातून स्वतःच्या ६ वर्षाच्या दिव्यांग मुलाला मगरींचे वास्तव्य असलेल्या तलावात फेकून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दाम्पत्यामध्ये मोठा मुलगा विनोदच्या प्रकृतीच्या कारणावरून सतत खटके उडायचे. मोठा मुलगा जन्मतःच दिव्यांग असल्याने बोलू शकत नव्हता. त्यांना दोन वर्षांचा आणखी एक मुलगा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पती रवी कुमार हा मोठ्या मुलाच्या दिव्यांग स्थितीवरून पत्नी सावित्रीबरोबर वाद घालत असे, तो सावित्रीला प्रश्न करत असे की तिने अशा मुलाला जन्म का दिला? कधी कधी तर तो “मुलांना फेकून दे” असेही बोलत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुन्हा भांडण सुरु झाले अन..

पोलिसांकडील प्राप्त माहितीत नमूद केल्याप्रमाणे शनिवारी सावित्रीचे याच कारणावरून पतीसोबत पुन्हा भांडण सुरु झाले. ज्यावरून तणावात असलेल्या सावित्रीने तिच्या मोठ्या मुलाला मगरीचे वास्तव्य असलेल्या तलावात फेकून दिले. त्यानंतर शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या आणि शोधपथकाच्या सहाय्याने मुलाला वाचवण्यासाठी शोधकार्य सुरु केले, परंतु रात्र झाल्याने अंधारात मुलाला शोधणे कठीण झाले. दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु झाले आणि विनोदचे शव पोलिसांना सापडले. ज्यामध्ये त्याच्या शरीरावर गंभीर जखमा, चावा घेतल्याच्या खुणा आणि एक हातही गायब असल्याचे आढळून आले.

हेही वाचा- केंद्रीय विद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; पैसे परत मागितल्याने आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी

सावित्री घरकाम करायची तर तिचा पती रवी कुमारही घरकामातील मदतनीस म्हणून काम करत असे. त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कौटुंबिक तणावाने ग्रासून लोक अनेकदा रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतात आणि निष्पाप जीवांचे बळी जातात. रवी आणि सावित्री यांच्या या प्रकरणावरून हेच सिद्ध होत असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.