खाजगी सुरक्षा संस्थेच्या मदतीने एक कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सीबीआयने शनिवारी प्रसिद्ध अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेच्या (एआयआयएमएस) उपमुख्य सुरक्षा अधिकाऱ्याच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली आणि महत्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतली.
प्रथम दर्जाचा अधिकारी असणाऱ्या उपसुरक्षा अधिकारी राजीव लोचन याने २००९-१० या काळात जनकपुरी येथील प्रेहरी सुरक्षा संस्थेचा मालक कमलजित सिंग याच्याशी संगनमत करून सुरक्षा पुरविण्याचे व सुरक्षा उपकरणे बसविण्याचे कंत्राट त्याच्या कंपनीला मिळवून दिले होते. या दोघांनी गैरव्यवहार करून एआयआयएमएस संस्थेला एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार आहे.
याप्रकरणी सीबीआयने लोचन आणि सिंग यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने याप्रकरणी लोचन याची चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने लोचन आणि सुरक्षा एजन्सीचा मालक सिंग यांच्या घराची तसेच कार्यालयांचीही झडती घेतली.या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. दरम्यान, देशातील प्रख्यात शैक्षणिक संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.