महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तृती सुमनं उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन शेअर केलेला फोटो आपल्या अधिकृत पेजवरुन चंद्रकांत पाटील यांनी शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना चंद्रकांत पाटील यांनी मोदींसारखा तेजस्वी पंतप्रधान भारताला लाभणं हे भारतीयांचं सौभाग्यच असल्याचं म्हटलं आहे.

झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ डिसेंबर रोजी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन स्वत:चा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मोदींनी अगदी गुडघ्यापर्यंत लांब असणारा परदेशात थंडीच्या वेळी वापरतात तसा कोट परिधान केला आहे. तसेच त्यांच्या हातात काही फाइल्स आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी, “आज माझ्या जम्मू-काश्मीरमधील बांधवांशी चर्चा करायला जातानाचा क्षण” अशी कॅप्शन दिली आहे. जम्मू काश्मीरमधील निवडणुकांचे निकाल समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. जम्मू-काश्मीरमध्ये मुक्त आणि पारदर्शक वातावरणात अलीकडेच झालेल्या जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुका आणि त्यामधील मतदारांचा सहभाग हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- ..तर २०२४ मध्ये रायबरेली सुद्धा तुमच्याकडे राहणार नाही, स्मृती इराणींचा काँग्रेसला इशारा

मोदींनी या भाषणानंतर पोस्ट केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. १४ हजारहून अधिक जणांनी हा फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोवर ४८ हजार कमेंट्सही आहेत. याशिवाय हा फोटो लाईक करणाऱ्यांची संख्या ८ लाख ५६ हजारांहून अधिक आहे.

मोदींच्या भाषणाबरोबरच त्यांचा हा फोटोही चांगलाच चर्चेत आला. हाच फोटो शेअर करत चंद्रकांत पाटील यांनी, “नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि देशाच्या विकासासाठी अविरत परिश्रम करण्याची जिद्द त्यांच्या या छवीतुनच दिसून येते. असा तेजस्वी पंतप्रधान भारताला लाभणं, हे आपलं सौभाग्यच,” असं म्हटलं आहे.

सध्या चंद्रकांत पाटील यांनी शेअर केलेल्या या फोटोवरही संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात जात असल्याचे फोटोखालील कमेंट सेक्शनमधून दिसून येत आहे. काहींनी मोदींचं कौतुक केलं आहे तर काहींनी मोदींना ट्रोल केलं आहे.