छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या धर्म संसदेमध्ये धर्मगुरु कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकारण तापलं आहे. कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरताना गांधींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचं कौतुक केलं. या प्रकरणामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी निराजी व्यक्त केलीय. हे प्रकरण समोर आल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी तातडीने एफआयआर दाखल करुन घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तसेच या प्रकरणामध्ये दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री बघेल म्हणालेत. अशी वक्तव्य करणाऱ्यांना संत नाही तर गुंड म्हणावं लागेल असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

आता एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय. या प्रकरणासंदर्भात कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलीय. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एखाद्या कटाप्रमाणे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री बघेल यांनी केलाय. अशा प्रकरणांमध्ये आयोजकांनाही खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं सांगताना या चौकशीनंतर संबंधित प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

आयोजकांनी या कार्यक्रमाचं संरक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती केली होती त्यामध्ये महंत राम सुंदर दास यांचाही समावेश होता. राम सुंदर दास हे भाजपाचे आमदार आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सनातन धर्मासंदर्भात चर्चा घडवून आणली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आलेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण: वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली ‘धर्म संसद’ म्हणजे काय?, तिथे घडलं तरी काय?

या कार्यक्रमामध्ये अशाप्रकारचं वादग्रस्त वक्तव्ये केली जातील, गोडसे आणि गांधींबद्दल या कार्यक्रमात चर्चा होईल असं वाटलं नव्हतं. धर्म संसदेमधील चर्चेत गांधी आणि गोडसेंचा उल्लेख कसा आला? सनातन धर्मावर चर्चा करण्यासाठी घेतलेल्या या कार्यक्रमामध्ये राजकीय चर्चा झाल्याचा आरोप मुख्यमंत्री बाघेल यांनी केला.

नक्की वाचा >> आता पाकिस्ताननेही भारताला सुनावलं; धर्म संसदेतल्या भाषणांवरून भारतीय अधिकाऱ्याकडे व्यक्त केली चिंता

धर्म संसदेचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. ज्या पद्धतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरण्यात आले ते सामान्य व्यक्तींना हे पटण्यासारखं नाहीय, असंही मुख्यमंत्री बघेल म्हणाले.

“अशाप्रकारे गुंड भगवं वस्त्र धारण करुन अशी भाषा वापरत असतील तर त्यांना संत म्हणता येणार नाही. आयोजकांनाही अशा कार्यक्रमांमध्ये अशा व्यक्तींना बोलवलं पाहिजे ज्यांच्यामुळे समाजाला फायदा होईल. मात्र अशा कार्यक्रमांना बोलवण्यात आलेली लोक भगवी वस्त्रं धारण करुन अशी वक्तव्य करणार असतील त्यांना संत नाही, गुंड म्हणावं लागेल. गुंडांनी भगवी वस्त्र धारण केली तर त्यांना संत म्हणता येणार नाही,” असं मुख्यमंत्री बघेल म्हणाले.

नक्की वाचा >> ७६ ज्येष्ठ विधिज्ञांचे सरन्यायाधीशांना पत्र ; धर्मसंसदेतील चिथावणीखोर वक्तव्ये

छत्तीसगडमध्ये भाजपाकडून धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र राज्यात भाजपाला सतत तोंडघाशी पडावं लागत आहे. राज्यातील १५ निवडणुकांपैकी १४ मध्ये त्यांचा पराभव झालाय. हे जनतेने भाजपाला दिलेलं उत्तर आहे, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.