वकिलाचा गौप्यस्फोट; सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस जारी

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राजीनाम्यास भाग पाडण्यासाठी त्यांना लैंगिक छळाच्या प्रकरणाता गोवण्याचा कट आखण्यात आल्याचा खळबळजनक दावा एका वकिलाने केला असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने या वकिलाकडून म्हणणे मागवले आहे.

न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने वकील उत्सव सिंग बेन्स यांना नोटीस जारी केली असून त्यांच्याकडून म्हणणे मागवले आहे. बेन्स  यांनी असा दावा केला होता की, सर्वोच्च न्यायालयातील माजी कर्मचारी महिलेने तिची बाजू मांडण्यासाठी व सरन्यायाधीशांविरोधात प्रेस क्लब ऑफ इंडियात पत्रकार परिषद घेण्यासाठी आपल्याला १.५ कोटी रुपये देऊ केले होते.

न्या. आर. एफ. नरिमन व न्या. दीपक गुप्ता यांचा समावेश असलेल्यो न्यायपीठाने सांगितले की, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी हे प्रकरण निगडित असून उद्या सकाळी साडेदहा वाजता यावर सुनावणी घेण्यात येईल.

शनिवारी सरन्यायाधीश गोगोई यांनी सुनावणी घेताना असे सांगितले होते की, माझ्यावर लैंगिक छळाचे आरोप करण्याच्या या प्रकरणात मोठा कट आहे व या आरोपांना उत्तर देऊन मी खालची पातळी गाठणार नाही. त्यानंतर वकील बेन्स यांनी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात म्हटले आहे की, या प्रकरणी करण्यात आलेले आरोप ऐकून धक्का बसला व आपण सदर तक्रारदाराची बाजू मांडण्याची तयारी दर्शवली होती, पण जेव्हा अजय या व्यक्तीने सगळा घटनाक्रम सांगितला तेव्हा त्यात अनेक त्रुटी व विरोधाभास दिसून आले. नंतर तक्रारदाराचे दावे तपासून पाहण्यासाठी भेट घडवून आणण्याची विनंती केली असता तसे करण्यास नकार देण्यात  आला त्यातून संशय निर्माण होत गेला. सरन्यायाधीशांना अडकवण्यासाठी ५० लाखांचा देकार अजय याच्याकडून ठेवण्यात आला असताना तो फेटाळला पण नंतर त्याने १.५ कोटी रुपये देऊ केले. त्यावेळी अभिसाक्षी या नात्याने आपण त्याला कार्यालयातून चालते होण्यास सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणांच्या निकालांचे फिक्सिंग केले जाते. त्यासाठी पैसे घेतले जातात. हे रॅकेट सरन्यायाधीशांनी मोडून काढले होते त्यामुळे फिक्सर्सचा त्यांच्यावर राग आहे व त्यातूनच हे प्रकरण झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबाबतचे वृत्त  काही न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात माजी महिला कर्मचाऱ्याने प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१८ मध्ये गोगोई यांनी दोनदा विनयभंग केला. त्यानंतर काही दिवसातच ते सरन्यायाधीश झाले. सदर महिलेने असा आरोप केला आहे की, गोगोई यांनी केलेल्या लैंगिक कृत्यांना प्रतिसाद न दिल्याने तिला सेवेतून काढण्यात आले. तिचा पती व दीर हे दोघे हेड कॉन्स्टेबल असून त्यांना २०१२ मध्ये एका गुन्हेगारी प्रकरणात निलंबित करण्यात आले. प्रत्यक्षात ते प्रकरण आपसात मिटवण्यात आलेले होते. नंतर तिला न्या. गोगोई यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नीच्या पायावर डोके ठेवून नाक रगडायला लावण्यात आले. तिच्या अपंग दिराला सर्वोच्च न्यायालयाने सेवेतून काढून टाकले. या महिलेने असा आरोप केला की, तिला पती व इतर नातेवाईकांसमवेत पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले व तेथे शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.