भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती का निर्माण झाली. चीनची मूळ समस्या काय आहे? या विषयावर फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सविस्तर भाष्य केलं. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते राज्यवर्धन राठोड हे लष्करात होते. २०१३ साली कर्नलपदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

“चीनला लागून असलेल्या सीमेवरील इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक प्रकल्प चीनच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे रखडले होते. पण नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात हे प्रकल्प वेगाने पूर्ण झाले” असे राठोड यांनी सांगितले. “दारबूक-श्योक-डीबीओ रस्त्याचे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित होते. पण २०१९ मध्ये हा काम पूर्ण झाले. हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. यामुळे भारतीय सैन्य तुकडयांना पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ सहजतेने पोहोचता येईल. रस्ता बांधणीचे काम वेगाने पूर्ण झाले हे चीन सहन करु शकला नाही” असे राठोड म्हणाले.

आणखी वाचा- आता कूटनीती, भारत-चीन सीमावादावर महत्त्वाची बैठक

“भारताचा विकास व्हावा अशी चीनची इच्छा नाही. पूर्व लडाखमध्ये वेगाने पूर्ण होणाऱ्या रस्ते आणि ब्रिजच्या कामामुळे सैन्य तुकडयांना वेगाने हालचाल करता यईल. चीनच्या विस्ताराच्या महत्वकांक्षेला हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे चीन इतका आक्रमक झाला” असे राठोड म्हणाले. “दक्षिण आशियापुरतीच भारताने मर्यादीत रहावे ही चीनची इच्छा आहे. पण आता हा जुना भारत राहिलेला नाही. आम्ही आमचे विकास प्रकल्प थांबवणार नाही” असे राठोड यांनी ठणकावून सांगितले.