हाडे गोठवून टाकणाऱ्या थंड प्रदेशातून वाट काढत क्षणार्धात ठरलेल्या ठिकाणी पोहोचवणारी जगातील सर्वात वेगवान ट्रेन शनिवारपासून चीनमध्ये धावू लागली आहे. उत्तर पूर्व चीनमधील जुन्या उद्योगांना नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या ट्रेनकडे पाहिले जात असून सध्या तीन प्रांतांतून ही अतिवेगवान ट्रेन आजपासून धावू लागली आहे.
हेईलाँगजियांगची राजधानी हारबीन, जिलिनची राजधानी चांगचून, लिआनिंगची राजधानी शेनयांग आणि लिआनिंगमधील बंदराचे शहर असणाऱ्या दालिआन येथून एकाच वेळी चार अतिवेगवान ट्रेन ९२१ कि.मी. अंतराच्या प्रवासाला निघाल्या.
तब्बल ३५० कि.मी. प्रतितास वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमध्ये अति थंड वातावरणाशी जुळवून घेणारे अतिप्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. सुमारे दोन महिने खडतर चाचण्या पार पडल्यानंतर सुसाट पळणारी ही ट्रेन उणे चाळीस तापमान असलेल्या प्रदेशातून शनिवारपासून धावू लागली आहे.
अतिवेगाने धावणारी ही ट्रेन ठरल्याप्रमाणे कार्यरत असल्यामुळे चीनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाचे उपमंत्री लु चुंगफँग यांनी दिली.