चीनची जनता साहसी असून आम्ही शत्रूविरोधात रक्तरंजित संघर्षासाठी तयार आहोत. आम्ही आमची १ इंच जागाही शत्रूला देणार नाही, असा इशाराच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. शत्रू म्हणजे नेमकं कोण हे त्यांनी भाषणात स्पष्ट केले नाही. मात्र, भारत- चीनमध्ये  सीमेवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

गेल्या आठवड्यात चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना आजीवन कार्यकाल बहाल करण्याच्या सुधारणेस मंजुरी दिली होती. यामुळे दोन टर्मच चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी राहता येईल, हे बंधन दूर झाले आहे. त्यामुळे जिनपिंग यांना मुदतवाढ मिळाली आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी जिनपिंग यांनी राष्ट्रवादावर भर दिला. ते म्हणाले, चीनची जनता आणि चीनमधील सरकार एकत्र असून आम्ही आमची एक इंच जागाही कोणाला घेऊ देणार नाही किंवा कोणी आमच्याकडून जागा हिसकावूनही घेऊ शकत नाही. जगात अव्वल स्थान गाठण्याची क्षमता चीनमध्येच आहे. गेली १७० वर्ष याच स्वप्नासाठी आपण लढत आहोत. आज चीनची जनता त्या स्वप्नांच्या जवळ पोहोचली आहे, असे त्यांनी भाषणात सांगितले. भारतासह तैवान, व्हिएतनामसोबत सीमेवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांच्या विधानांना महत्त्व प्राप्त होते.

माओ झेडाँग यांच्यानंतर आजीवन अधिकारपदावर राहणारे जिनपिंग हे पहिलेच नेते आहेत. दोन कार्यकालाची मर्यादा काढून टाकणारी घटनात्मक सुधारणा ही अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासाठी लागू असेल. कम्यूनिस्ट पार्टी ऑफ चायनामध्येआतापर्यंत सामूहिक नेतृत्व व्यवस्था होती ती आता संपुष्टात आली असून जिनपिंग आता चीनचे नअभिषिक्त सम्राट बनले आहेत.