‘एनएसजी’ प्रकरणाचा वचपा काढत असल्याचा कांगावा

चीनच्या तीन पत्रकारांना भारताने व्हिसा मुदतवाढ नाकारली आहे, पण जर एनएसजीमध्ये चीनने केलेल्या विरोधामुळे भारताने अशी सूडाची कृती केली असेल तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा चीनच्या प्रसारमाध्यमांनी दिला आहे.

तीन भारतीय पत्रकारांच्या व्हिसा मुदतवाढीस भारताने दिलेला नकार म्हणजे क्षूद्रता आहे, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. भारताने चिनी पत्रकारांना व्हिसा मुदतवाढ नाकारताना कुठलेही अधिकृत कारण दिलेले नाही. चीनने एनएसजीमध्ये भारताला सदस्यत्व मिळण्यास विरोध केल्याने व्हिसा मुदतवाढ नाकारण्यात आल्याची चर्चा चालू आहे. भारत अशा पद्धतीने सूड घेत असेल तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असे या वृत्तपत्राने संपादकीयात म्हटले आहे. ‘भारताची पत्रकारांची हकालपट्टी करण्याची क्षूद्र कृती’ या संपादकीयात भारतावर टीका करण्यात आली आहे. चीनचे दिल्ली ब्यूरो प्रमुख वू क्वियांग व मुंबईतील वार्ताहर तांग लू व मा क्वियांग यांना व्हिसा मुदतवाढ नाकारण्यात आली. ते शिनहुआ वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या व्हिसाची मुदत महिनाअखेरीस संपत होती. तिघांनीही व्हिसा मुदतवाढ मागितली. आमचे उत्तराधिकारी पत्रकार येईपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती. काही परदेशी माध्यमांनी चिनी पत्रकारांची हकालपट्टी करण्यात आल्याचे म्हटले आहे. चिनी पत्रकारांना व्हिसा मुदतवाढ नाकारताना कुठलेच अधिकृत कारण देण्यात आले नाही. काही भारतीय माध्यमांनी असा दावा केला आहे, की दिल्ली व मुंबईत खोटय़ा नावाने काही लोक राहत असल्याची शक्यता आहे व त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. हे पत्रकार तिबेटच्या विजनवासातील कार्यकर्त्यांना भेटले होते. भारताच्या मनात संशय आहे. आमच्या पत्रकारांनी कमी मुदतीचा किंवा जास्त मुदतीचा व्हिसा मागितला किंवा काय याला महत्त्व नाही, त्यांना त्रास झाला हे खरे आहे.चिनी लोकांनाही भारताकडून व्हिसा मिळण्यात अडचणी आहेत. आम्हीही काही भारतीय लोकांना व्हिसा नाकारून आमचा व्हिसा मिळणेही अवघड आहे हे दाखवून दिले पाहिजे, असे चिनी माध्यमांनी म्हटले आहे. चीनचे भारतातील माजी प्रतिनिधी लु पेंगफे यांनी सांगितले की, भारतात चिनी पत्रकारांना खोटय़ा नावाने कुणाच्या मुलाखती घेण्याची गरज पडत नाही. दलाई लामा गटाच्या मुलाखती घेण्यासाठी वार्ताहर नेहमी विनंत्या करीतच असतात. भारताच्या कृतीने नकारात्मक संदेश गेला आहे. असे असले तरी संपादकीयत भारत-चीन यांच्यात मैत्रीचे संबंध असावेत, व्यापार वाढावा कारण तेच भारताच्या फायद्याचे आहे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.