यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) चीनमधून भारतात केली जाणारी आयात ३३ टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये सिक्किम सीमेवरील डोक्लाममध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. मात्र याच काळात दोन्ही देशांमधील व्यापारात मोठी वाढ झाली आहे. भारताने गेल्या तीन महिन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी सामग्री आणि रसायनांची आयात केली आहे. या काळात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य ५.५ टक्क्यांनी तर चीनच्या युआनचे मूल्य ३.७ टक्क्यांनी वधारले आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’ने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

यंदाच्या वर्षाच्या पहिल्या आर्थिक तिमाहीत भारताने एकूण १८ अब्ज डॉलरचे (११ हजार कोटी रुपये) सामान चीनकडून आयात केले. मागील वर्षाच्या पहिल्या आर्थिक तिमाहीचा विचार केल्यास चीनकडून केली जाणारी आयात १३.५ अब्ज डॉलर (८ हजार कोटी रुपये) इतकी होती. रुपयाचे मूल्य वधारल्याने भारतीय व्यापारी मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात करत आहेत. ‘राजकीय आणि आर्थिक समस्या वेगवेगळ्या असतात. सध्या देशांतर्गत बाजारपेठेला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. रोजगार निर्मिती वाढावी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत,’ असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी एका वृत्तापत्रासोबत बोलताना म्हटले.

दोन्ही देशांमधील सीमावादाचा फटका द्विपक्षीय व्यापाराला बसणार नाही, असे मत क्रिसिल या अर्थसंस्थेचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. जोशी यांनी व्यक्त केले आहे. चीनकडून डोक्लाम भागात रस्त्याच्या निर्मितीचे काम सुरु होताच दोन्ही देशांमध्ये वादाला सुरुवात झाली. सिक्किम सीमेवरील डोक्लाम भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असल्याने भारतीय सैन्याकडून रस्त्याचे काम रोखण्यात आले. ४० टन वजनांची लष्करी वाहने सहज ये-जा करु शकतील, अशा रस्त्याची निर्मिती चीनकडून डोक्लाममध्ये करण्यात येत होती. मात्र भारतीय लष्कराने रस्त्याच्या या कामाला आक्षेप घेतला.