काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी बाबरी पतन रोखण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याची टीका करत पक्षाला घरचा अहेर दिला आहे. 1992 रोजी नरसिम्हा राव यांच्या नेतृत्वातील सरकार बाबरी पतन रोखण्यात अपयशी ठरलं. बाबरी पतन रोखण्यासाठी जी पाऊलं उचलणं गरजेची होती ती घेतली गेली नाहीत असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं आहे. दिल्लीत सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाद्वारा आयोजित ‘एक शाम बाबरी मस्जिद के नाम’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘बाबरी पतन रोखण्यात सरकार का अपयशी ठरलं याचं कोणतंही स्पष्टीकरण दिलं जाऊ शकत नाही. मी काँग्रेस पक्षाचा नेता असून बाबरी पतन रोखण्याची जबाबदारी पूर्णपणे आमची होती. तत्कालीन पंतप्रधान नरसिम्हा राव यांनी जे निर्णय घेण्याची गरज होती ते घेतले नाहीत’, अशी टीका मणिशंकर अय्यर यांनी केली आहे.

‘बाबरी पतन का रोखण्यात आलं नाही यासाठी दिलेल्या कोणत्याही कारणावर विश्वास ठेवण्यास मी तयार नाही. भारताची पुन्हा एकदा फाळणी करण्याचा तो प्रयत्न होता आणि आम्ही तो रोखायला हवा होता. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा तो प्रयत्न होता. आपल्या राष्ट्रीय एकतेवर त्यादिवशी हल्ला करण्यात आला होता’, असं मणिशंकर अय्यर यांनी यावेळी म्हटलं.

यावेळी मणिशंकर अय्यर यांनी भाजपा सरकारवर टीका करत यामागे ज्यांचा हात होता त्यांना लोकांनी 2014 मध्ये सत्तेवर येण्याची संधी दिली पण त्यांना संधीचा फायदा घेता आला नाही असं म्हटलं. राम मंदिरावर बोलताना मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं. राजा दशरथाच्या महालात १० हजार खोल्या होत्या. त्यामुळे श्री राम कोणत्या खोलीत जन्माला आले कोणाला ठाऊक?, असे विधान त्यांनी केले.

अय्यर म्हणाले, तुमची इच्छा आहे तर तुम्ही अयोध्येत राम मंदिर जरुर उभारा मात्र, मंदिर वही बनाएंगे असं आपण कसं म्हणू शकता. मंदिर वही बनाएंगे याचा अर्थ काय? ते पुढे म्हणाले, दशरथ मोठे राजा होते असं सांगितल जातं तसेच त्यांच्या महालात १० हजार खोल्या होत्या. त्यामुळे कोणाला सांगता येईल का की कोणती खोली कुठे होती. मात्र, आज आपला केवळ समज असल्याने आज उभी असलेली मशीद उध्वस्त करुन त्याठिकाणी राम मंदिर उभारायचं ठरवलंय. अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले आहे.

मणिशंकर अय्यर हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या एका विधानावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. काँग्रेसच्या एका बैठकीत ते म्हणाले होते की, मोदी जर इकडे चहा विकायला आले तर काँग्रेस त्यांचे स्वागत करेन.