गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर अस्वस्थ झालेले काँग्रेस नेते आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मदतकार्यात अडथळा होऊ नये यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी उत्तराखंडचा दौरा करू नये असा सल्ला दोन दिवसांपूर्वी दिला होता. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यानंतर लगेचच उत्तराखंडला भेट दिल्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे शिंदे यांनी बुधवारी घूमजाव केले. उत्तराखंडमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून मोदींसह इतर नेतेही पूरग्रस्त भागाला भेट देऊ शकतात, असे सांगत राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर आपली बाजू सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शिंदे म्हणाले की, सुरुवातीला उत्तराखंडमधील परिस्थिती बिकट होती. वेगाने सुरू असणाऱ्या मदतकार्यात अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून मी राजकीय नेत्यांना त्या भागात न जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच जे नेते हा सल्ला मानणार नाहीत, त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी देणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर लगेचच राहुल गांधी यांनी उत्तराखंडला भेट दिल्यामुळे शिंदेंची अडचण झाली.
उत्तराखंडमधील आपत्तीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, हरियाणाचे भूपिंदरसिंग हुड्डा, राजस्तानचे अशोक गेहलोत आदींनी या भागाला भेट दिली. तर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी हवाई पाहणी केली होती.
उत्तराखंडवरील नैसर्गिक संकटात मदतीसाठी दोन्ही सदनातील खासदारांना प्रत्येकी ५० लाख रुपये देता येतील. याबाबत केंद्राने खासदारांना स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपये देण्यास परवानगी दिली आहे. त्यांच्या मतदारसंघ विकासनिधीतून उत्तराखंडमध्ये एखाद्या जिल्ह्य़ात ५० लाख रुपयांची विकासकामे सुचवता येतील, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सध्या लोकसभेत ५३९ तर राज्यसभेत २४३ सदस्य आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये ३६१ कोटी रुपयांची विकासकामे सुचवता येतील. या संदर्भात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणीमंत्री श्रीकांत जेना यांनी खासदारांना पत्रे पाठवली आहेत. आपत्ती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2013 रोजी प्रकाशित
राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचे घूमजाव
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर अस्वस्थ झालेले काँग्रेस नेते आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मदतकार्यात अडथळा होऊ नये यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी उत्तराखंडचा दौरा करू नये असा सल्ला दोन दिवसांपूर्वी दिला होता. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यानंतर लगेचच उत्तराखंडला भेट दिल्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे शिंदे यांनी बुधवारी घूमजाव केले.

First published on: 27-06-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress justifies vvip rahul gandhis visit to uttarakhand