नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसचे नेते रडकुंडीला आले. इतक्या वर्षांपासून गरीबांकडून लुटलेला पैसा त्यांना एका क्षणात गमवावा लागला अशी घणाघाती टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. राजकोटमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. भ्रष्टाचार, जातीयवाद आणि घराणेशाही या सगळ्याचा काँग्रेसशी जवळचा संबंध आहे. आम्ही या गोष्टींचा विरोध करतो म्हणून काँग्रेसचे धोरण आमच्या विरोधातले आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे.

सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर भारताची प्रगती होते आहे. मात्र जागतिक संस्थांनी दिलेल्या रॅकिंगची काँग्रेसने बदनामी केली. आमच्या विरोधात त्याचा वापर मते मागण्यासाठीही काँग्रेसने केला. मात्र उत्तर प्रदेशात नुकत्याच ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडल्या. त्यांचे जे निकाल लागले त्या निकालांवरून आमच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसला उत्तर मिळाले आहे. आता गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून भाजपने काय केले अशी विचारणा होते आहे. मात्र मागील ७० वर्षात या काँग्रेसने देशासाठी काय केले? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.

आरोग्य, शिक्षण, मूलभूत सेवा-सुविधा या सगळ्याच आघाड्यांवर गुजरातचा विकास भाजपने केला आहे. त्याचमुळे गुजरातची जनता भाजपच्या सोबत आहे. येथील विधानसभा निवडणुकांमध्येही पुन्हा कमळच फुलणार आहे अशी खात्रीही पंतप्रधानांनी व्यक्त केली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त प्रसारित केले आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर केल्यापासूनच काँग्रेसने भाजपचा हा निर्णय चुकला असल्याची भूमिका घेतली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही हा निर्णय कसा चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र याच निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.