भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले असले तरी काँग्रेसने या प्रकारचा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री रतनजीत प्रताप नरेन सिंग यांनी शनिवारी ही स्पष्टोक्ती केली.
काँग्रेस हा प्रथेनुसार चालणारा पक्ष आहे. निवडणुकीआधी मुख्यमंत्री अथवा पंतप्रधानपदासाठी उमेदवारी घोषित करण्याची आमची प्रथा नाही. आमचे निवडून आलेले आमदार-खासदारच मुख्यमंत्री वा पंतप्रधानांच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, आतापर्यंत असेच होत आले आहे आणि आगामी निवडणुकीतही हीच प्रथा पाळली जाईल, असे ते म्हणाले. भाजपने मोदी यांच्या नावाची घोषणा केल्याने काँग्रेसही तीच री ओढणार का, या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले. या वेळी त्यांनी मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी दवडली नाही. आपला देश सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वावर चालणारा आहे, मोदी यांचा मात्र यावर विश्वास नाही. जाती-धर्माच्या नावाखाली देशाची विभागणी करण्याचे राजकारण ते करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
मुझफ्फरनगरवरून राजकारण नको
मुझफ्फरनगरमधील तणाव आता निवळला आहे, तरीही केंद्र सरकार तेथील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तेथील संवेदनशील परिस्थितीचा कोणत्याही पक्षाने राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
या दंगलीत ४७ जणांचा बळी गेला असून अद्याप ५४२ समाजकंटकांना पोलिसांनी अटक केली आहे.