वाराणसीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून फलक

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून प्रियंका गांधी-वढेरा यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी विनंती करणारे पोस्टर्स गुरुवारी शहरामध्ये सर्वत्र झळकले.

उत्तर प्रदेश आणि शेजारच्या राज्यांमधील मतदारांमध्ये चैतन्य आणण्यासाठी प्रियंका गांधी-वढेरा यांना थेट मोदी यांच्याविरुद्ध मैदानात उतरवावे, अशी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचीही मागणी आहे.

प्रियंका गांधी-वढेरा मध्यभागी, वरील भागात राहुल गांधी आणि तळामध्ये स्थानिक नेता अजय राय अशी पोस्टर्स वाराणसी शहरभर झळकली आहेत. ‘काशी की जनता करे पुकार, प्रियंका गांधी हो संसद हमार’, वुई वॉण्ट प्रियंका, अशा घोषणा ठळक अक्षरांमध्ये पोस्टर्सवर लिहिण्यात आल्या आहेत. प्रियंका यांची वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी करणार पोस्टर्स घेऊन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लहुरबीर वसाहतीमध्ये मोर्चाही काढला.

उत्तर प्रदेशात सरकार स्थापनेचे लक्ष्य

अमेठी : उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या काँग्रेसच्या नव्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांना राज्यात काँग्रेसचे पुढील सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य देण्यात आल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे सांगितले. प्रियंका गांधी-वढेरा यांची उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाच्या सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील निवडणुकीत भाजपचा पराभव करून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांच्यावर सोपविण्यात आली आहे, असे गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारत वक्तव्य केले होते. त्या संदर्भाने राहुल म्हणाले की, आपण भाजपमुक्त भारत असे म्हणणार नाही. गुजरात, उत्तर प्रदेश अथवा तमिळनाडू असो, प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आक्रमकपणे लढेल.