फरिदाबाद दलित जळीतकांडप्रकरणी सरकारवर दोषारोपांचे खापर फोडण्यापासून सरकारचा बचाव करण्यासाठी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या विधानामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एखाद्याने कुत्र्याला दगड मारल्यास त्यासाठी सरकारला दोषी धरता येऊ शकणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य सिंग यांनी केले आहे.
सिंह म्हणाले, हे पहा, एखाद्या गावाच्या कोपऱ्यात घडणाऱ्या घटनेचा संबंध थेट केंद्राशी कसा काय जोडला जाऊ शकतो, असा सवालही त्यांनी या वेळी केला.
या वक्तव्यामुळे सिंग यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सिंग यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे. गुजरात दंगलींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘पपी’ वक्तव्यावरही विरोधकांनी टीका केली आहे.
स्थानिक घटनेचा सरकारशी कधीही संबंध जोडण्यात येऊ नये, फरिदाबादच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, दोन कुटुंबांमध्ये कलह होता, तो कशावरून होता, प्रशासन कोठे कमी पडले यानंतर तो प्रश्न केंद्राकडे येतो, असे सिंग म्हणाले. एखाद्याने कुत्र्याला दगड फेकून मारला तर त्याला सरकार जबाबदार नसते, असे सिंग यांनी गझियाबाद येथे सांगितले. दोन लहान मुलांना जाळून मारल्याच्या घटनेची तुलना कुत्र्याला दगड फेकून मारण्याशी केली जाते हे घृणास्पद असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी या वेळी केली.

हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक
पीटीआय, फरिदाबाद
दलित कुटुंबावर सवर्णाकडून करण्यात आलेल्या हल्लाप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या सात झाली आहे.
पीडित कुटुंबाने आरोप केलेल्या एकूण ११ आरोपींपैकी सात जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना आम्ही लवकरच अटक करू, असे पोलीस आयुक्त सुभाष यादव यांनी सांगितले. तीन आरोपींना गुरुवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. गावातील परिस्थिती आता नियंत्रणात असून तपास सुरू असल्याचे यादव यांनी सांगितले. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेला राजकीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे खट्टर म्हणाले. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासानुसार ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असल्याची माहिती पोलीस महासंचालक वाय. पी. सिंगल यांनी दिली. हरयाना सरकारने या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. सवर्णानी लावलेल्या आगीत दलित कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेत मृत मुलांची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर दिल्ली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांचा बचाव करताना वडील जितेंद्र हेदेखील जखमी झाले. या प्रकरणी पोलीस अधिकारी अनिल कुमार यांच्यासह आठ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.