देशभरात करोनाचा फैलाव वाढताना दिसतो आहे. कारण एक दिवसात संपूर्ण देशात ८८ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ६९४ वर गेली आहे. तर करोनामुळे भारतात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये तीन मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. तर कर्नाटकात दोघांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश, तामिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, हिमाचाल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १३० वर पोहचली आहे. गुरुवारी पाच रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातलीही करोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाग्रस्त आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांना सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन उद्धव ठाकरे सरकारने वारंवार केलं आहे. सुरुवातीला काहीशी संभ्रमाची स्थिती होती. मात्र आता लोक सोशल डिस्टंस, गरज असेल तरच बाहेर पडणं या गोष्टी पाळू लागले आहेत.

देशात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प आहेत. अशात आता भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६९० च्या वर पोहचली आहे ही भारतासाठी निश्चितच चिंतेची बाब म्हटली पाहिजे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सरकारला सहकार्य करणं आणि घराबाहेर न पडणं या गोष्टी आपण सजग नागरिक म्हणून पाळल्या तर आपण करोना व्हायरससोबत सुरु असलेलं युद्ध जिंकू शकतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.