उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये काम करणारा एक 20 वर्षीय मजूर बिहारच्या सारण येथे आपल्या घरी परतण्यासाठी निघालाय. तब्बल 1,000 किलोमीटरचा प्रवास तो करतोय. आग्रापर्यंतचा 200 किलोमीटरचा प्रवास त्याने पायी केला. तिथून पुढे 350 किलोमीटर, लखनऊपर्यंत त्याला एका ट्रक ड्रायव्हरने सोडलं. पण, त्यासाठी त्या ट्रक चालकाने ओम प्रकाशकडे भाडं आकारलं, आणि आता ट्रक चालकाचं भाडं देऊन त्याच्याकडे केवळ 10 रुपये शिल्लक राहिलेत.

घरी जाण्यासाठी अजून शेकडो किलोमीटर पायपीट करायचीये पण त्याच्याकडे आता काहीच पैसे शिल्लक नाहीत. तरीही ओम प्रकाशने आपला घरचा प्रवास सुरू ठेवलाय. घरी जायची आस आणि डोळ्यातल्या अश्रूंना आवर घालत “माझ्याकडे आता फक्त 10 रुपये उरलेत. आग्राहून लखनऊपर्यंत येण्यासाठी ट्रक ड्रायव्हरने 400 रुपये घेतले. मला माहित नाही आता मी काय करणार आहे”, असं ओम प्रकाश ‘एनडीटीव्ही’शी बोलताना म्हणाला.

ओमप्रकाशसारखे हजारो प्रवासी लखनऊच्या जवळ एका टोल प्लाझावर थांबलेत. आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी शेकडो किलोमीटर त्यांची पायपीट सुरू आहे. ट्रक चालकांना रग्गड पैसे मोजून काही तिथपर्यंत पोहोचलेत. अनेकांच्या खिशात तर पैसेही शिल्लक नाहीयेत. पण अजून त्यांना शेकडो किलोमीटरचा टप्पा गाठायचाय.

सरकारने मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केल्या आहेत. पण तरीही देशभरात अनेक राज्यांमध्ये सध्या असंच चित्र आहे. ट्रकमधून लपून, सायकल घेऊन, रिक्षाने, रस्ता आणि रेल्वे रुळांच्यामार्गे मजूर पायपीट करत घरी निघाले आहेत.